“मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर पक्ष न पाहता पाठीशी उभे राहू!”

शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब प्रकरणावरून वैभव नाईक आक्रमक; वेंगुर्ले पोलिसांना निष्पक्ष तपासाची मागणी

वेंगुर्ले : शिरोडा येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप करत माजी आमदार तथा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी थेट वेंगुर्ले पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडून कारवाईबाबत माहिती घेतली.

“धनदांडग्यांच्या मायनिंगला विरोध केला म्हणून एखाद्या आंदोलनकर्त्याला अमली पदार्थांच्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवले जात असेल, तर त्याला आमचा ठाम विरोध राहील. संबंधित कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू,” असा स्पष्ट इशारा वैभव नाईक यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले आणि सावंतवाडी परिसरातील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पांच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात सिद्धेश परब हे सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक तसेच मायनिंगविरोधी कृती समितीकडून केला जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.

“सिद्धेश परब शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्या प्रश्नाकडे आम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहणार नाही. अन्याय होत असेल तर पक्षभेद बाजूला ठेवून त्याविरोधात आवाज उठवणे ही आमची भूमिका आहे,” असे नाईक म्हणाले.

“सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाईचा पायंडा”

यावेळी वैभव नाईक यांनी विविध आंदोलनांदरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आंबा-काजू नुकसानभरपाई, अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलन, एलईडी मच्छीमारीविरोधातील आंदोलन तसेच देवगडमधील प्रकरणांचा उल्लेख करत, सरकारच्या निर्णयांना ग्रामस्थांनी विरोध केला की त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा चुकीचा पायंडा जिल्ह्यात पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलीस निरीक्षकांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह

सिद्धेश परब प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या पूर्वीच्या काही तपासांबाबतही नाईक यांनी प्रश्न उपस्थित केले. दोडामार्गमधील सासोली आणि वेंगुर्लेतील दाभोली जमीन गैरव्यवहार प्रकरणातील त्यांच्या तपासाबाबत संशय व्यक्त करत, सिद्धेश परब प्रकरणाचा तपास दुसऱ्या सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली.

वेंगुर्ले तालुक्यात गेल्या वर्षभरातील अमली पदार्थांशी संबंधित कारवाईची माहिती घेतल्याचा दावा करत नाईक म्हणाले की, “जर सिद्धेश परब अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचा आरोप असेल, तर त्यासंदर्भात यापूर्वी काही कारवाया किंवा प्रकरणे समोर आली आहेत का, याचीही चौकशी झाली पाहिजे.”

अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीला आपला कायम विरोध असल्याचे स्पष्ट करत नाईक यांनी “मात्र अमली पदार्थांची कारवाई दाखवून एखाद्या आंदोलनकर्त्याला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात असेल, तर तो गंभीर विषय आहे,” असे सांगितले. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जि. प. सदस्य संजय गावडे, जि. प. सदस्य विजय नाईक, काँग्रेसचे इर्शाद शेख, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सुमन कामत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!