मालवण : मालवणहून कणकवलीच्या दिशेने मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ उतारावर अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेम्पो चालक गणेश तांडेल आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप टेम्पोसह मत्स्य विक्रेत्या महिलांना घेऊन मालवण येथून कणकवलीच्या दिशेने जात असताना ९.३० वाजण्याच्या दरम्यान आनंदव्हाळ उतारावर समोरून ओव्हरटेक करत येत असलेल्या मोटारीस वाचवण्यासाठी ब्रेक मारल्याने रस्त्याकडेची दगडी भिंत कोसळून अपघात झाला. सुदैवाने टेम्पो खाली दरीत जाता जाता झाडाला धडक बसल्याने थांबला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघातात जखमी झालेल्या मत्स्य विक्रेत्या महिलांना चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची खबर मिळताच मालवण येथून मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बांधव अपघातस्थळी दाखल झाले. मच्छिमार बांधव, व्यवसायिक, मत्स्य एजंट यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकही एकत्र आले. जेसीबीच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात आला. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस जितेंद्र पेडणेकर, श्री. परब, अजय येरम अधिक तपास करत आहेत.