तुम्ही जेवढं तोंड उघडाल, तेवढंच आदित्य ठाकरे अडचणीत येतील…

मंत्री नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला

दिशा सालियन प्रकरणात राजकारण नको; ही एका बापाची मुलीसाठीची लढाई

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांनी या प्रकरणावर अधिक बोलू नये. ते जेवढे तोंड उघडतील, तेवढेच त्यांच्या नेत्याचा मुलगा अडचणीत येईल,” असा दावा राणे यांनी केला.

संजय राऊत यांनी शुक्रवारी राणे कुटुंबावर जुने आरोप करत कणकवलीतील विविध प्रकरणांचा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, “तुम्ही एवढी वर्षे सत्तेत होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग त्या काळात या आरोपांची चौकशी का केली नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होतं?” असा सवाल उपस्थित केला.

राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणावर केलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. “दिशा सालियन प्रकरण हे आता न्यायालयीन आणि तपासाच्या प्रक्रियेत आहे. सतीश सालियन हे आपल्या मुलीसाठी न्यायाची मागणी करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये. सतीश सालियन जे काही करत आहेत, ते आपल्या मुलीसाठी आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार करत आहेत,” असे राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले की, “संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांनी जितके अधिक वक्तव्य करावे, तितकेच या प्रकरणातील प्रश्न अधिक चर्चेत येतील. त्यामुळे मी त्यांना मैत्रीचा सल्ला देतो, कृपया गप्प बसा आणि आपल्या मालकाच्या मुलाला सुरक्षित ठेवा.”

दरम्यान, दिशा सालियन यांच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना कधी भेटलो नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात सीबीआयने FIR दाखल करून तपास सुरू केला आहे.

संजय राऊत यांनी मात्र हा तपास ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठीचा राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग आला आहे. “ही राजकीय लढाई नसून एका बापाची आपल्या मुलीसाठीची लढाई आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या प्रकरणात येऊ नये,” असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!