मालवण : आंघोळीसाठी समुद्रात उतरलेल्या तासगांव सांगली येथील बाप व मुलाला पाण्यात बुडत असल्याचे पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला समुद्राच्या पाण्यात झोकून देत पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या देवबाग येथील तिघा वर्देकर बंधूचा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सत्कार केला.
ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास देवबाग भांजीवाडा किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घडली होती. तासगांव येथील संतोष माळी (४३) व सिद्धार्थ माळी (१६) हे आंघोळीसाठी भांजीवाडी येथील समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. यावेळी त्यांची आरडाओरड ऐकून येथील बस्त्याव वर्देकर, पीटर वर्देकर, अल्बर्ट वर्देकर या तीन सख्ख्या भावांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता समुद्रात उडी घालून समुद्रात बुडत असणाऱ्या या दोन्ही बाप मुलाला बाहेर आणले. त्यांच्या धाडसामुळे देवबागमध्ये एक मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे वर्देकर बंधुच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करत प्रेमाची भेट सुपूर्द केली. यावेळी त्यांच्या सोबत देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रीक्स, स्टीव्हन रॉड्रीग्ज, प्रसाद मुननकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते..