मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला रंगणार खुले स्थानिक कवी संमेलन

नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी; सेवांगणचे आवाहन

मालवण : मालवणमधील कवी-कवयित्रींच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानित, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन- २०२६ च्या निमित्ताने या विशेष कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, चिवला बीच, मालवण येथे हे संमेलन रंगणार आहे.

या संमेलनात मालवण व परिसरातील नवोदित तसेच प्रस्थापित कवी आणि कवयित्रींना आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे, काव्यलेखनाची आवड जोपासणे आणि नव्या साहित्यिकांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. मालवणच्या साहित्यविश्वातील विविध काव्यप्रवाह, नव्या लेखनप्रतिभा आणि अनुभवी कवींच्या सृजनशीलतेचा संगम या संमेलनाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

कवी-कवयित्रींसाठी नावनोंदणी सुरू!या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी-कवयित्रींनी आपली स्वरचित कविता आणि संक्षिप्त परिचय ऋतुजा केळकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२०४ २३७९० वर पाठवून नावनोंदणी करावी. मालवण व परिसरातील सर्व नवोदित आणि प्रस्थापित कवी-कवयित्रींनी या साहित्यिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!