शिवसेना भाजप महायुतीच्या वतीने मालवण बंदर जेटीवर महिलांचा ‘नारळ महासंग्राम’!

सोन्याची नथ, पैठणीपासून फ्रिज-वॉशिंग मशीनपर्यंत बक्षिसांची बरसात; महायुतीच्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला यंदा मालवण बंदर जेटीवर धमाल रंगणार आहे. नारळ लढविण्याच्या मैदानात महिलांचा महासंग्राम पाहायला मिळणार असून, विजेत्यांवर सोन्याची नथ, पैठणी, फ्रिज, वॉशिंग मशीनसह आकर्षक बक्षिसांची अक्षरशः बरसात होणार आहे. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने, आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी ही माहिती दिली.

नारळी पौर्णिमेच्या उत्सवातील पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धेला यंदा मोठ्या बक्षिसांची झळाळी मिळाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या महिलेच्या पदरात सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज पडणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, तिसऱ्या क्रमांकासाठी चांदीचा कुंकवाचा करंडा, चौथ्या क्रमांकासाठी चांदीचा छल्ला, तर पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर देण्यात येणार आहे.

बक्षिसेच बक्षिसे… महिलांचा उत्साह शिगेला!

मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या परंपरेतील नारळ लढविणे स्पर्धेला यंदा भव्य बक्षिसांची जोड मिळाल्याने बंदर जेटीवर महिलांच्या उत्साहाचा माहोल पाहायला मिळणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेला खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेपूर्वी नावनोंदणी अनिवार्य

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता स्पर्धा सुरू होण्याच्या एक तास अगोदर बंदर जेटी येथे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी भाजप महिला शहराध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर – ९४०४३४४३२२ किंवा शिवसेना कुडाळ-मालवण संघटक तथा मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण – ९४०४६८९३१६ यांच्याशी संपर्क साधावा.

नारळी पौर्णिमेच्या जल्लोषात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मालवणच्या पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धेची रंगत वाढवावी, असे आवाहन शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!