
दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई; काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्याचे निर्देश
मालवण : कामात दिरंगाई करणाऱ्या अथवा संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारांची कोणतीही गय केली जाणार नाही. कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया प्रस्तावित करावी, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण नगरपरिषदेच्या अभियंत्यांना दिले.
येथील नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी शहरातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रत्येक कामाला गती देतानाच त्याची गुणवत्ता कायम ठेवण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस नगराध्यक्षा ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह नगरपरिषदेचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत भाजी मार्केट नूतनीकरण, मामा वरेरकर नाट्यगृह वाणिज्य संकुल व नाट्यगृह नूतनीकरण, रॉक गार्डन सुशोभीकरण, नमो उद्यान विकास, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्मिती, नगरोत्थान योजना, पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी कामांची वेळेत पूर्तता, दर्जा आणि नियोजन याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. विकासकामे रखडण्यास अथवा अनावश्यक विलंब होण्यास जबाबदार ठरणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मालवण शहराचा पर्यटनपूरक विकास, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांना आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






Subscribe to my channel






