आपत्कालीन सेवेत धावणाऱ्या ‘जीवनदूतां’चा गौरव

लायन्स क्लब मालवणतर्फे ॲम्बुलन्स चालकांचा विशेष सन्मान; पाच चालकांचा प्रातिनिधिक सत्कार

मालवण | कुणाल मांजरेकर

रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देताना प्रत्येक क्षणाशी शर्यत करणाऱ्या आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवून अनेकांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांचा लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. सेवा सप्ताहाचे औचित्य साधून मालवणातील पाच ॲम्बुलन्स चालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयापर्यंतचा प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी वाहतूक कोंडी, रस्त्यांची परिस्थिती आणि वेळेचे आव्हान यांचा सामना करत रुग्णांना सुरक्षितपणे आणि कमीत कमी वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ॲम्बुलन्स चालक करतात. त्यांच्या या सेवाभावी आणि जबाबदारीच्या कार्याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ मालवणने हा सन्मान सोहळा आयोजित केला.

यावेळी अवधूत परुळेकर, गणेश कुडाळकर, यश मालवणकर, सदा मयेकर आणि दत्तात्रय मयेकर या पाच ॲम्बुलन्स चालकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापार्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी क्लबच्या सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, तसेच जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, गणेश प्रभुलकर, बाळू अंधारी, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास, रुजारिओ पिंटो, अंजली आचरेकर, रूपा कांदळगांवकर यांच्यासह क्लबचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आपत्कालीन सेवेत अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम त्यांच्या सेवेला समाजाकडून मिळालेली कृतज्ञतेची पावती ठरला.

error: Content is protected !!