मंत्री नितेश राणेंच्या कठोर भूमिकेचा दणका ; महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणारी कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!

दोनदा हुलकावणी देणाऱ्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले; तांडेलसह सात खलाशी जाळ्यात

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी घेतलेल्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर विभागाकडून सागरी गस्त आणि कारवाईला वेग देण्यात आला आहे. याच मोहिमेत कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान (Sulthan)’ ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करताना पकडून जप्त करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या पारंपरिक मासेमारी क्षेत्रात परप्रांतीय नौकांकडून होणारी घुसखोरी, बेकायदा ट्रॉलिंग आणि स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे होणारे नुकसान या प्रश्नांवर मंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अशा नौकांविरोधात कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्याचे निर्देश आणि भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सागरी गस्तीला आणि अंमलबजावणी मोहिमेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दोनदा निसटली, तिसऱ्या प्रयत्नात जाळ्यात!

२ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक नियमित सागरी गस्त घालत असताना मुणगे समोरील समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘सुलतान’ ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौकेला पाहताच संबंधित नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विभागाच्या पथकाने तिचा पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर देवगडसमोरील समुद्रात नौकेला रोखण्यात यश मिळवले.

विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत याच परिसरात मलपी बंदरातील नौकांना पकडण्यासाठी विभागाने दोन वेळा प्रयत्न केले होते. मात्र, संबंधित नौका अधिक क्षमतेच्या आणि वेगवान असल्याने त्या दोन्ही वेळा निसटल्या होत्या. तरीही अधिकाऱ्यांनी पाठलाग आणि शोधमोहीम थांबवली नाही. सातत्याने लक्ष ठेवत तिसऱ्या प्रयत्नात ‘सुलतान’ नौका जप्त करण्यात आली. रात्रीच्या अंधारात भर समुद्रात केलेल्या या कारवाईमुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या हद्दीत परवानगी नसतानाही मासेमारी!

जप्त करण्यात आलेल्या ‘सुलतान’ नौकेचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6335 असा आहे. श्रीमती गुलफाम अब्दुल मुनाफ या नौकेच्या मालक असून त्या कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या नौकेचा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (EEZ) वैध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा अधिकार नसतानाही नौका येथे मासेमारी करत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. जप्त नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

स्थानिक मच्छिमारांच्या तक्रारींची दखल

मालवण आणि देवगड परिसरातील मच्छिमारांनी मलप्पे बंदरातील नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या नौकांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांची मासेमारीची जाळी वारंवार तोडली जात असल्याचेही सांगण्यात आले होते. या तक्रारींची दखल घेत मत्स्यव्यवसाय विभागाने संबंधित नौकांवर लक्ष केंद्रित केले होते. स्थानिक मच्छिमारांच्या तक्रारी केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष समुद्रात उतरून कारवाई करण्याची भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतल्याने या मोहिमेकडे विशेष लक्ष लागले आहे. ‘सुलतान’ नौकेच्या जप्तीमुळे बेकायदा मासेमारीविरोधातील कारवाईला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

नितेश राणेंच्या भूमिकेमुळे कारवाईला बळ; शून्य सहनशीलतेचा संदेश!

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीचे संरक्षण, स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित आणि पारंपरिक मासेमारी क्षेत्रातील नियमांचे पालन या मुद्द्यांना मंत्री नितेश राणे यांनी प्राधान्य दिले आहे. परराज्यातील नौकांनी महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून बेकायदा मासेमारी केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती आणि तपासणी अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.

मालवणचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला आणि देवगडचे अंमलबजावणी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विभागाच्या ‘शीतल’ या गस्ती नौकेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक दीपेश मायबा, दिवाकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी कारवाईत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम पार पडली.

मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ‘सुलतान’ नौकेवरील कारवाईने परप्रांतीय नौकांच्या बेकायदा घुसखोरीविरोधातील मोहिमेला नवे बळ मिळाले आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

error: Content is protected !!