नगराध्यक्ष कालावधीतील विकासकामांचा मांडला लेखाजोखा : नगराध्यक्ष म्हणून पाच नाही तर नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी ; १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात यश


आमदार निलेश राणेंचे व्हिजन आमच्या “कल्पनाशक्ती पलीकडील”, येणाऱ्या पाच वर्षामध्ये मालवणचा चेहरा मोहरा बदलून जाणार
महिला नगराध्यक्ष मिळालेल्या संधीचे मालवणच्या विकासासाठी सोने करतील असा विश्वास व्यक्त
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. नगराध्यक्ष म्हणून पाच नाही तर नऊ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगून नगराध्यक्ष म्हणून १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात यश आल्याचे म्हटले आहे.
श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिवसेना भाजप युती आणि मालवणच्या जनतेच्या आर्शिवादाने २०१६ ते २०२१ या कालावधीमध्ये मालवण नगरपालिका नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी मला प्राप्त झाली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगरपालिकेतील कर्मचारी म्हणून काम केल्याच्या प्रशासकीय अनुभवावर रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा बरोबर मालवण शहर हे पर्यटन दृष्टीने विकसित होण्यासाठी विकासकामे प्रस्तावित करण्यात आली. आमच्या या कालावधीत जवळपास १०० कोटी रुपयाची कामे प्रस्तावित करण्यात आली. या पाच वर्ष कालावधीत जवळपास दोन वर्ष कोरोनाचे संकट आल्याने निधीची कमतरता आणि कोरोनाच्या कालावधीतील लॉकडाऊन यामुळे बरीचशी प्रस्तावित कामे आमच्या कालावधीत सुरू होऊनही आमचा कालावधी संपेपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. या पाच वर्षाच्या कालावधी मालवण शहराचा विकास हाच ध्यास घेवून कोणतेही राजकारण न करता काम करण्यावर भर देण्यात आला. माझे शिवसेना भाजप युतीतील माझे सहकारी नगरसेवक यांनी सहकार्य केलेच पण विरोधी पक्षातील नगरसेवक यांनी सुद्धा काही अपवाद वगळता विकास कामामध्ये सहकार्याची भूमिका घेतली. सभागृहामध्ये पूर्ण पाच वर्षाच्या कालावधीत फक्त दोन तीन वेळा ठरावावर मतदान झाले. बाकी सर्व ठराव एकमताने घेण्यात आले हे यश त्याचेच द्योतक आहे.
मालवण शहरासाठी गरज असलेली भुयारी गटार योजना निधी अभावी बंद होती. ती आमच्या कालावधीत शासनाकडे पाठपुरावा करून सुमारे १० कोटी रुपये अनुदान प्राप्त करून ही योजना पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण कोरोनाचं संकट आणि ठेकेदार याची अनास्था यामुळे हे काम आमच्या कालावधीत पूर्ण होऊ शकले नाही याचे कायम शल्य राहणार आहे. त्याच प्रमाणे आमचा कालावधी संपल्या नंतर मागील चार वर्षाच्या प्रशासकीय कालावधीत ही योजना पूर्ण करण्यासाठी कुठलाही पाठपुरावा किवा ठोस निर्णय घेण्यात आला नाही ही वस्तूस्थिती आहे.
शहराची नळपाणी योजना ही बरीच जुनी असल्याने ती सुधारित करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने सुमारे ४० कोटी रुपयाची नळपाणी योजना प्रस्तावित करून शासनाकडून मंजूर करून घेण्यात आली. परंतू सुधारित अंदाजपत्रक करणे आणि शासनाची मंजुरी घेणे यात बराच वेळ गेल्याने हे काम आमच्या कालावधीत सुरू करता आले नाही. पण त्यानंतर आता हे काम मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात पण झाली आहे.
मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या झपाट्याने वाढणारे शहर आहे. शहरामध्ये विकासक मोठ्या प्रमाणात विकास कामे करत आहेत. दहा दहा मजल्याच्या इमारती बांधल्या जात आहेत. पर्यटन दृष्ट्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत . असे असताना त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी नगर पालिका म्हणून आपली आहे हे गृहीत धरून सुमारे २ कोटी किमतीची अग्निशमन इमारत बांधण्यात आली आणि सुमारे ५५ लाख रुपयाची सुसज्ज अशी अग्निशमन गाडी घेण्यात आली.
मालवण शहराचा कारभार ज्या इमारतीमधून हाकला जातो ती इमारत आणि त्याचा परिसर सुंदर असावा, पार्किगची सोय असावी, या उद्देशाने सुमारे १.५० कोटी रुपये खर्चून हे सुशोभीकरण करून नगरपरिषदेला एक सुंदर रूप देण्यात आले. मालवण शहरातील जनतेला एकाच ठिकाणी जावून भाजी, फळे इत्यादी खरेदी करता यावी आणि विक्रेते याना बसण्यासाठी सुसज्ज असे मार्केट मिळावे या दुष्टीने सुमारे २ कोटी किमतीचे भाजी मार्केट इमारतिचे काम सुरू करण्यात आले. सध्या हे काम प्रशासकीय त्रुटी मुळे शासनाकडून काही परवानग्या घेणे आवश्यक असल्याने बंद आहे.
सध्या पर्यटकांच्या पाहिल्या पसंतीत उतरलेले मालवण नगरपरिषद रॉक गार्डन, सगळ्यात सुंदर असा चिवला बीच आणि बंदर जेटी येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयाच्या डेकोरेटिव्ह लाइट बसवून सौदर्यकरण करण्यात आले. कोकणातील पहिला सुमारे १ कोटी २५ लाख रुपयाचा म्युझिकल फाऊंटन रॉक गार्डन मध्ये बसविण्यात आला. त्याच प्रमाणे सुमारे २५ लाख रुपये किमतीची खेळणी बसविण्यात आली. त्यामुळे पर्यटकांची संख्या तर वाढलीच पण त्या बरोबर स्थानिक मालवणवासियासाठी विरंगुळ्याच ठिकाण झाले. स्थानिक लोकांच्या व्यवसायामध्ये पण वाढ झाली.
मामा वरेरकर नाट्यगृह येथे ३०० लोकांची क्षमता असणारा सुमारे ७५ लाख कीमतीचा एसी मल्टिपर्पज हॉल बांधण्यात आला. त्यामुळे लग्न, विविध कार्यक्रम, सभा यासारखे कार्यक्रमातून नगरपरिषद उत्पन्नात भर पडणार आहे. अंतर्गत काही कामे शिल्लक असल्याने ती झाल्या नंतर त्याचे लोकार्पण होणार आहे. मालवण शहरात प्रवेश करताना शहराचा एक चांगला प्रभाव पडावा , मालवण वासियांसाठी पण एक विरंगुळा ठिकाण मिळाव या हेतूने आडारी गणपती मंदिर नजीक, तसेच कोळंब बीच नजीक शहराच्या प्रवेश द्वारावर सुमारे ४० लाख किमतीचे डेकोरेटिव्ह लाइट, पाथवे, रेलिंग बसवून सुशोभिकरण करण्यात आले . त्याचबरोबर सुमारे ८६ लाख रुपयाचे सेल्फी पॉइंट मालवण शहराच्या महत्वाचे ठिकाणी बसविण्यात आले. यात बंदर जेटी येथे उभारलेले मावळ्याचे पुतळे, बाजारपेठ, प्रमुख उद्याने, कोळंब पूल नजीक उभारलेले स्टॅच्यू याचा समावेश आहे.
मालवण शहरातील मुख्य चौक, किनारपट्टी, प्रमुख देवालय मिळून लहान आणि मोठे मिळून सुमारे २ कोटी रुपयाचे ३२ हायमास्ट बसविण्यात आले. त्याच प्रमाणे संपूर्ण शहरात ऊर्जा बचत व्हावी या उद्देशाने स्ट्रीट लाइट वरील ट्यूब लाइट काढून त्या ठिकाणी सुमारे १कोटी २५ लाख रुपयाचे एल इ डी लाइट बसविण्यात आले. मालवण शहर हे पर्यटन शहर आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाना शहरात फिरताना अडचण येवू नये म्हणून संपूर्ण शहरात सुमारे २५ लाख रुपयाचे दिशादर्शक फलक बसविण्यात आले.
मालवण शहरात सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, वॉटरस्पोर्ट्स, गणपती मंदिर अशी पर्यटन ठिकाणे आहेत. येणारा पर्यटक हा जास्त दिवस मालवण मधे कसा थांबेल या उद्देशाने सुमारे २५ कोटी रुपयाचे अद्यावत मत्स्यालय रेवतळा येथे प्रस्तावित केले होते. यासाठी ११ कोटी रुपये शासन निधी पण मिळाला होता. परंतु अजून जागा घेणेबाबत जमिनीचे मालक यांच्या बरोबर वाटाघाटीस उशीर होत असल्याने आमच्या कालावधीत हे काम सुरू करणे शक्य झाले नाही.
आमच्या पाच वर्षाच्या कालावधी मध्ये जिल्हा नियोजन मधून सुमारे १५ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. यामधून लोकप्रतिनिधीनी सुचवलेली नवीन रस्ते, गटारे, स्वच्छते बाबत कामे, रस्ते डांबरीकरण इत्यादी विकास कामे करण्यात आली. दांडी, धुरीवाडा, गावकर वाडा याठिकाणी नवीन रस्ते निर्माण करण्यात आले; ज्यांचा फायदा तिकडच्या स्थानिक लोकाना झाला. अश्या प्रकारची जवळपास १०० कोटीची कामे प्रस्तावित करण्यात आली. यातील बरीचशी कामे आमच्या कालावधीत पूर्ण झाली, काही कामे आमच्या कालावधीत सुरू झाली पण आमच्या कालावधी नंतर पूर्ण झाली. तसेच चार वर्षाच्या प्रशासकीय कालावधीत वारंवार सूचना करूनही प्रलंबित कामाबद्दल पाठपुरावा करण्यात प्रशासकाच्या उदासीन भूमिकेमुळे अजूनही काही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. याबाबतचे सविस्तर निवेदन आमदार निलेशजी राणे यांना देण्यात आले आहे आणि ते याबाबत पाठपुरावा करत असून लवकरच ती सर्व कामे सुरू होणार आहेत. कारण आमच्या आमदारांचे व्हिजन हे आमच्या कल्पनाशक्ती पलीकडील आहे त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामधे मालवणचा चेहरा मोहरा बदलून जाणार यात शंका नाही.
येणाऱ्या निवडणूका या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आम्हाला या कार्यकर्त्यांच्या जीवावर नगराध्यक्ष पद भूषवता आले. त्यामुळे येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत नगरसेवक पदाची निवडणूक लढणार नाही तर एखादा कार्यकर्ता नगरसेवक होण्यासाठी प्रयत्न करणार. त्याच प्रमाणे यावेळी नगराध्यक्ष हे महिलांसाठी आरक्षित झाले आहे. आणि महायुतिची निर्विवाद सत्ता येणार यात काही शंका नाही. त्यामुळे होणाऱ्या नगराध्यक्ष याना मालवणच्या विकासासाठी आमच्या २१ वर्ष प्रशासकीय आणि पाच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुभवाच्या जोरावर सहकार्याची भूमिका राहणार आहे, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Subscribe to my channel




