ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू”

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केली असून, मागणी मान्य न झाल्यास टोल नाका बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रातून ओसरगाव टोल नाक्याविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिंधुदुर्गातील वाहनधारकांकडून टोल वसूल करणे अन्यायकारक असून, स्थानिकांची आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी या पत्रातून दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार या मार्गावरून प्रवास करावा लागतो. तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही दररोज या मार्गावरून ये-जा असते. अशा परिस्थितीत ओसरगाव येथे टोलवसुली सुरू राहिल्यास सामान्य सिंधुदुर्गवासीयांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले.

रायगडमध्ये ६५ रुपये, सिंधुदुर्गात १२५ रुपये?

टोलदरातील तफावतीवरही राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रायगड जिल्ह्यात छोट्या वाहनांसाठी पहिल्या टप्प्यासाठी ६५ रुपये टोल आकारला जात असताना, ओसरगाव टोल नाक्यावर छोट्या वाहनांसाठी पहिल्या टप्प्यासाठी १२५ रुपये टोल आकारला जाणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या दरातील मोठ्या फरकामुळे सिंधुदुर्गवासीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, “टोलच्या नावाखाली सिंधुदुर्गवासीयांची लूट सहन केली जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी घेतली आहे.

टोलमाफी नाही तर आंदोलन!

सिंधुदुर्गातील वाहनांना ओसरगाव टोल नाक्यावरून ये-जा करताना पूर्ण टोलमाफी मिळावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. यापूर्वीही या विषयावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, प्रश्न सुटला नाही तर आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

“सिंधुदुर्गवासीयांना लुटणारा हा टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे लागले, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मागे हटणार नाही,” अशी आक्रमक भूमिका राऊत यांनी घेतली आहे.

error: Content is protected !!