मसुरे खाडीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईकर युवकाचा बुडून मृत्यू
५ जणांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता खाडीपात्रात ; सुदैवाने चौघांना किनारा गाठण्यात यश
मसुरे : मुंबई – ठाणे येथून पर्यटनासाठी आलेल्या ५ तरुणांचा ग्रुप पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक तरुण बुडल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही दुर्घटना कालावल खाडीपात्रात मसुरे टोकळवाडी जेटी नजीक घडली. देवेंद्र जनार्दन जाधव ( वय- ४०, रा. ठाणे पश्चिम) असे या तरुणाचे नाव असून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्थानिकांनी राबवलेल्या शोधमोहीमेत त्याचा मृतदेह मिळून आला आहे.
मसुरे मार्गचितड येथील एका फार्म हाऊस वर हे सर्व जण थांबले होते. सायंकाळी पाण्यात पोहण्यासाठी ते खाडीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले. मात्र सुदैवाने चार जणांना किनारा गाठण्यात यश आले. मात्र देवेंद्र जाधव आपला जीव वाचवू शकला नाही. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मसुरे आरोग्य केंद्र येथें रात्री उशिरा करण्यात येणार आहे. मृतदेह शोधण्यासाठी बाबा सय्यद, इस्माईल सय्यद, कुणाल हडकर, रोहित नार्वेकर, राजू मुणगेकर आदींसह ग्रामस्थानी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलिस कॉन्स्टेबल पी. बी.नाईक, विवेक फरांदे अधिक तपास करत आहेत.