कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ५१.८१ लाखाची आर्थिक फसवणूक

मुख्य संशयित शुभम कृष्णात देशमुख याला अटक ; सात दिवसांची पोलीस कोठडी

मालवण : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत मालवण येथील भारती घारकर यांची तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी शुभम कृष्णात देशमुख बँकेचा संस्थापक अध्यक्ष यास सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने माननीय न्यायदंडाधिकारी वर्ग १ मालवण यांचे आदेशाने ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. मालवण न्यायालया समोर हजर केले असता त्यास ७ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली. संशयित आरोपी शुभम कृष्णात देशमुख राहणार, एकोंडी ता. कागल जि.कोल्हापूर सध्या राहणार कळंबा, कोल्हापूर हा फरार होता. न्यायालयांमध्ये त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत विविध प्रक्रिया, शुल्क व बँक व्यवहारांच्या नावाखाली फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली. कर्ज मंजुरी, प्रक्रिया शुल्क, कागदपत्रांची पूर्तता, बँक व्यवहार आदी कारणे सांगून एकूण ५१,८१,५०० रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्ज उपलब्ध करून न देता आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. प्रमुख संशयित आरोपी शुभम कृष्णात देसाई याचा शोध सुरू असताना ११/०८/२०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. मालवण न्यायालया समोर हजर केले असता त्यास ७ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

दरम्यान, या गुन्ह्यातील इतर संशयित आरोपींचा शोध आता अधिक तीव्र करण्यात आला असून, त्यांच्याविरोधातही लवकर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बँक खात्यांमधील देवाणघेवाण, रोख व्यवहार, संबंधित कागदपत्रे तसेच इतर संभाव्य संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. पोलिस तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे व त्यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

error: Content is protected !!