१०० विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली सायकलची ‘गती’; आ. निलेश राणेंच्या हस्ते मोफत सायकलींचे वाटप

शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने कट्टा हायस्कुलमध्ये उपक्रम; शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी मदतीचा हात

मालवण : शिक्षणाची जिद्द असली, तरी अनेकदा आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या वाटचालीसमोर अडथळा ठरतात. अशाच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, यासाठी कट्टा येथे शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील १०० गरजू विद्यार्थ्यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले.

नवी मुंबई शिवसेना उपशहरप्रमुख महेश (बाबा) परब व नरेश गोविंद परब व शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या सायकलींचा लाभ मिळाला. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारे ठरले.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सायकल नव्हे, ‘संधी’ देत आहोत!

यावेळी आमदार निलेश राणे यांनी किशोर पाटकर यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. “गरजू विद्यार्थ्यांना सायकल देणे म्हणजे केवळ एक वस्तू देणे नाही, तर त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला गती देणे आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे सांगत त्यांनी पाटकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा, वेळ वाचावा आणि त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे, या उद्देशाने करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कट्टा संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहू : निलेश राणे

आमदार निलेश राणे यांचे प्रशालेत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीत सदैव सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. स्वर्गीय संजय नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार राणे यांनी सांगितले.

शैक्षणिक वाटचालीचा गौरव

संस्था सचिव सुनील नाईक यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे संस्थेला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले असून, आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे हेही संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

शतकोत्सव साजरा करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. किशोर पाटकर यांच्या सौजन्याने झालेल्या सायकल वाटपाबद्दलही त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

दत्ता सामंतांकडून किशोर पाटकरांचे अभिनंदन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या गतिमान कार्याचे कौतुक करत कट्टा शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली उपलब्ध करून देऊन किशोर पाटकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे सांगत त्यांनी पाटकर यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, संस्था सचिव सुनील नाईक, उपाध्यक्ष तथा कट्टा-गुरामवाडचे सरपंच शेखर पेणकर, खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, पर्यवेक्षक महेश भाट, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपा सावंत, विश्वास गावकर, अरविंद करलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, विभागप्रमुख राजन माणगावकर, बाळ महाभोज, आबा कामतेकर, प्रताप चव्हाण, मनमोहन डीचोलकर, शेखर फोंडेकर, दया देसाई, समीर रावले यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर व वीणा मयेकर यांनी केले.

error: Content is protected !!