हरी खोबरेकरांची वायफळ बडबड : मोदींच्या दौऱ्यामुळे झोपड्याना नोटीसा पाठवल्याचा पुरावा द्या

दामोदर तोडणकर यांचे आव्हान ; खा. राणे यांच्यामुळेच दांडी आवारवाडी अस्तित्वात, नाहीतर केव्हाच जमीनदोस्त झाली असती : देवबागचे स्थलांतरण देखील राणेसाहेबांनीच रोखले

आपल्या १० वर्षात किनारपट्टीवर नोटीसा आल्या नसल्याचं वैभव नाईक खोटं का बोलले, याचे उत्तर खोबरेकरांनी द्यावं

मालवण | कुणाल मांजरेकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यामुळे किनारपट्टी वरील मच्छिमारांना नोटीसा आल्याचा आरोप करणाऱ्या उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी वायफळ बडबड बंद करून त्याचे पुरावे द्यावेत. बंदर विभाग अथवा महसूल प्रशासनाने या दौऱ्याचे कारण दाखवून बजावलेली नोटीस दाखवावी, असे आव्हान मत्स्य व पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी दिले आहे. खासदार नारायण राणे यांनी आजपर्यंत मच्छिमारांसाठी काय केले, हे विचारण्यापूर्वी दांडी आवार वाडी आज कोणामुळे अस्तित्वात आहे, याची माहिती घ्यावी. राणेसाहेब आमदार असताना येथील मच्छिमारांना देखील नोटीसा आल्या होत्या. पण राणेसाहेबांनी त्याला कडाडून विरोध केल्यानेच आज आवारवाडीचे अस्तित्व शिल्लक आहे. देवबाग गाव देखील राणे साहेबांमुळेच आपले अस्तित्व टिकवून आहे, असे सांगून इतर वायफळ बडबड करण्यापेक्षा आपल्या कारकिर्दीत मच्छिमारांना नोटीसाच आल्या नाहीत, हे खोटं वक्तव्य माजी आमदार वैभव नाईक यांनी का केलं ? याचं उत्तर हरी खोबरेकर यांनी द्यावं, असे दामोदर तोडणकर म्हणाले.

मालवण किनारपट्टीवर मच्छिमारांना अतिक्रमीत बांधकामे हटवण्याच्या नोटीसा आल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी प्रांताधिकाऱ्यांसह बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावर टीका करत आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात मच्छिमारांना नोटीसा आल्या नसल्याचा दावा केला होता. या आरोपांना २४ तासात उत्तर देत आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या कार्यकाळात अतिक्रमण हटवण्याच्या तब्बल ३५२ नोटीसा आल्याचे दाखवून दिले होते. तर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देखील माजी आमदारांवर टीका केली होती. त्याला काल ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उत्तर देत ३५२ पैकी जास्त नोटीसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी देण्यात आल्या होत्या, असा आरोप केला होता. याला दामोदर तोडणकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मच्छिमारांच्या झोपड्या तोडल्याचा हरी खोबरेकर यांनी केलेला आरोप खोटा आहे. याबाबत एकतरी नोटीस त्यांनी दाखवावी. वास्तविक तुमच्याकडे बोलण्याचे मुद्देच नाहीत. म्हणून तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात. तुम्ही मच्छिमारांच्या पाठीशी होता तर वैभव नाईक यांच्या माध्यमातून त्यांचे किती प्रश्न सोडवलेत ? असा सवाल करून प्रशासन प्रत्येक वेळी नोटीसा पाठवणारच. पण त्याना विरोध करणे लोकप्रतिनिधीचे काम आहे. नारायण राणे आमदार, मंत्री असताना त्यांनी मच्छिमारांच्या कित्येक झोपड्या वाचवल्या. नाहीतर दांडी आवारवाडा कधीच नेसतानाबूत झाला असता. राणेंच्या शब्दा खातर येथील मच्छिमारांच्या झोपड्या अजूनही टिकून आहेत. राणे साहेब, राणे कुटुंबाने कधीही, कोणाच्या घरावर बुलडोझर चालवले नाहीत. कोणाचा संसार उध्वस्त केला नाही. 

…. तर माझी झोपडी तुटली नसती !

माझी झोपडी निलेश राणे यांच्यामुळेच टिकून होती. प्रशासन माझ्या झोपडीवर नियमबाह्य पद्धतीने कारवाई करण्यासाठी आले असताना निलेश राणे यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. अन्यथा माझी झोपडी तुटली नसती. कारण त्यावर कोर्ट केस सुरु होती. निलेश राणे कोण कोणत्या पक्षाचा आहे हे बघत नाहीत. न्याय देताना सर्वांना समान न्याय देतात. पण वैभव नाईक तेव्हा आमदार होते. मी निलेश राणे यांचा चाहता असल्याने त्यांनी माझी झोपडी तोडताना विरोध केला नाही, असे दामोदर तोडणकर म्हणाले.

error: Content is protected !!