
डेडलाइननंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर
कणकवलीसह माणगाव तिठ्यावरील खड्डे बुजविले, नागरिकांना मोठा दिलासा
कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत कामासाठी डेडलाइन निश्चित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचरा मार्गावरील खड्डे रविवारी रात्री उशिरापर्यंत बुजविण्यात आले. कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा परिसरातील खड्ड्यांवरही तातडीने कार्यवाही करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार असल्याने रस्त्यांची दुरवस्था हा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न बनला होता. कणकवली-आचरा मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत होता. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी केवळ आढावा घेण्यापुरती भूमिका न ठेवता अधिकाऱ्यांना थेट कामाला लागण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल तसेच सावंतवाडी विभागाच्या श्रीमती इंगवले यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालकमंत्र्यांच्या या स्पष्ट निर्देशांनंतर यंत्रणाही वेगाने कामाला लागली.
कणकवलीचा आचरा मार्ग हा नियमित वर्दळीचा असल्याने खड्डे बुजविण्याचे काम रात्रीच्या वेळेतही सुरू ठेवण्यात आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत काम करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ‘सूचना द्या आणि त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे’, या भूमिकेतून पालकमंत्री नितेश राणे यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर घेतलेली तत्परता नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. बैठकीत सूचना देऊन त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले की नाही, याकडे लक्ष ठेवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाहीही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशांमुळे या मोहिमेला मिळालेली गती नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाढणारी वाहतूक लक्षात घेता रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला मिळालेली ही गती महत्त्वाची मानली जात आहे. पालकमंत्र्यांनी वेळेत घेतलेली दखल आणि अधिकाऱ्यांना दिलेली डेडलाइन यामुळे रस्त्याच्या प्रश्नावर प्रत्यक्ष परिणाम दिसून येत असल्याने कणकवली शहरवासीयांनी समाधान व्यक्त करत नितेश राणे यांच्या तत्पर कार्यवाहीचे स्वागत केले आहे.






Subscribe to my channel






