चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प ; जिल्ह्यात मत्स्यदुष्काळाची स्थिती

संकटग्रस्त मच्छिमारांना आर्थिक सहाय्य मिळावे : मच्छिमारांचे सहाय्यक मत्स्यआयुक्तांना निवेदन

मालवण : कोकण किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय पुर्ण ठप्प झाला असून मत्स्यदुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटग्रस्त मच्छिमारांना आर्थिक सहाय्य मिळावे, या मागणीचे निवेदन दांडी येथील रश्मीन रोगे यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयास देण्यात आले.

यावेळी अन्वेशा आचरेकर, भाई जाधव, वसंत गावकर, विकी रोगे, सागर जाधव, बाळा मिठकर यांसह अन्य उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले १० दिवस आपल्या कोकण किनारप‌ट्टीवर जे चक्रीवादळ घोंगावत आहे. यामुळे पूर्णतः मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांवर मत्स्यदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार मच्छिमारांना कृषी दर्जा प्राप्त झाला आहे. तरी ज्याप्रमाणे आमच्या शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत जसे अर्थसाहाय्य मिळते त्याच धर्तीवर पारंपरिक मच्छिमारांना सुद्धा आर्थिक सहाय्य मिळावे. अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांच्या वतीने करत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!