
दुष्काळाच्या संकटात राजकारण नको; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करा : धोंडू चिंदरकर यांचा वैभव नाईकांना सल्ला
सिंधुदुर्गातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणेंचे कौतुक; पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाईची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यावर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका भाजपच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेला तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर प्रभारी पंकज साधये, रश्मी लुडबे, नगरसेवक ललित चव्हाण, सौ. शिल्पा खोत, अमृता फाटक, संतोषी कांदळकर, बंडू कांबळी, पं. स. सदस्य योजना कांबळी आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत श्री. चिंदरकर यांनी दुष्काळ, पाणीटंचाई, भातशेतीचे नुकसान आणि पाणी अडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावर भूमिका मांडली. ते म्हणाले, यंदा कोकणात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांसह शेतीशी संबंधित घटकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

‘सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे’
भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मालवण तालुक्यातील विविध भागांत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत क्षमा हडकर (जिल्हा परिषद सदस्य)शाम झाड, दीपक सुर्वे, महेश मांजरेकर , सुमित सावंत, समृद्धी आसोलकर, योजना कांबळी, राजू परुळेकर महेंद्र चव्हाण, अरुण परब, शाम वाक्कर, पूजा वेरळकर,शिल्पा खोत, बंडू गावडे, रोहेश गावकर, सीमा परुळेकर सुशांत सुर्वे माधुरी मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काही ठिकाणी कृषी व महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. शेती वरून हिरवी दिसत असली तरी भाताचे प्रत्यक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करून नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे कौतुक करण्यात आले. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शासनस्तरावर उपाययोजना सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच खासदार नारायण राणे यांनी भविष्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणी फाउंडेशनशी चर्चा केली असून, पाणी अडविणे आणि जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांवर भर देण्याची भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.
‘पाणी अडवा, पाणी साठवा’वर भर
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चे बंधारे उभारणे, उपलब्ध पाणी अडविणे आणि जलसाठे वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालवण तालुक्यातील गावागावांत अशा उपाययोजना राबविण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.
‘ही राजकारणाची वेळ नाही’
दुष्काळाच्या परिस्थितीत विरोधकांनीही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र यावे, असे आवाहन श्री. चिंदरकर यांनी केले. माजी आमदार वैभव नाईक यांनी जलजीवन मिशनशी संबंधित निधी आणि ठेकेदारांच्या देयकांचा मुद्दा उपस्थित केला असल्याचा संदर्भ देत, या प्रश्नांवरही शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे सांगतानाच वैभव नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाच्या संकटात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुका येत-जात राहतील, मात्र सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र काम करण्याची असल्याचे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना ‘कामचुकारपणा’ न करण्याचा सल्ला
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळाच्या संकटातून शेतकरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.







Subscribe to my channel






