
विद्यार्थी-पालकांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न ; सैनिक स्कूलच्या संस्कारमय, शिस्तबद्ध आणि नेतृत्वकेंद्री वातावरणाची माहिती
सावंतवाडी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी संपन्न झाला. शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार पासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिक शाळेच्या संस्कारमय, शिस्तबद्ध आणि नेतृत्वकेंद्री वातावरणाची माहिती यानिमित्ताने विद्यार्थी व पालकांना देण्यात आली.
कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, संस्थेचे सीईओ तथा शाळेचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस व डे बोर्डिंग विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली शेट्टी यांनी केले. सैनिक शाळेतील शिक्षण ही केवळ शैक्षणिक प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, स्वावलंबन, राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना विकसित करणारी जीवनशैली असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांनी स्वतःची ओळख करून दिली व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

प्रियांका देसाई यांनी सैनिक स्कूल मान्यताप्राप्त करण्याचा प्रवास आणि शाळेची आगामी वाटचाल यावर प्रकाश टाकला. सैनिक शाळेतील मूल्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीची जोड देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. सॅव्हिओ फर्नांडिस यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन सादर केले आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेचे नियम, शिस्तीचे महत्त्व आणि दैनंदिन दिनक्रम याविषयी देखील मार्गदर्शन केले. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आता शाळेने स्वीकारली असून पालकांनी निर्धास्त राहावे, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला.

ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भोसले सैनिक स्कूल केवळ एक शिक्षण संस्था नसून भावी नेतृत्व घडविणारी कार्यशाळा असल्याचे सांगितले. सुनेत्रा फाटक यांनी आपल्या मनोगतात भावनिक आठवणींना उजाळा दिला. आपला भाऊ व मुलगा सैनिक शाळेत शिक्षणासाठी गेल्याचा अनुभव सांगताना उपस्थित पालकांच्या मनातील भावना आपणही अनुभवल्याचे त्या म्हणाल्या. मुलांना यशस्वी करिअरचा मजबूत पाया देण्यासाठी सैनिक शाळा ही सर्वोत्तम संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.








Subscribe to my channel






