महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी श्री विशाळगड येथे सकल हिंदू समाज, शाहुवाडी (कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून महाराजांना वंदन केले. यावेळी विशाळगडाच्या पवित्र भूमीवर शिवरायांच्या मूर्तीची वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी विधिवत पूजा केली.
स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते, तर ते स्वाभिमान, न्याय, धर्मरक्षण आणि रयतेच्या कल्याणासाठी उभारलेले पवित्र ध्येय होते. त्या तेजस्वी परंपरेचे आपण सर्व वारसदार आहोत. छत्रपतींचे विचार, त्यांचा त्याग आणि त्यांचे राष्ट्रकार्य प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे, हेच त्यांना खरी मानवंदना ठरेल. “जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात.” अशी भावना ना. नितेश राणे यांनी व्यक्त केली.