अफगाणिस्तान मधून १२० नागरिकांना घेऊन एअरफोर्सचं विमान भारतात दाखल

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली असून मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान १२० भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं.
भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानातून १२० भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी आणण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.
भारत सरकारने अफगाणिस्तानसाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष देखील उभारला आहे. याशिवाय भारत अफगाणिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!