
आठ दिवसांत पार्किंग सुरू; धबधब्यापर्यंत ई-वाहन सेवा
पालकमंत्री नितेश राणेंचा ‘ॲक्शन प्लॅन’; एमटीडीसीच्या जागेत पहिल्या टप्प्यात ७० ते ८० वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था
सिंधुदुर्गनगरी : आंबोलीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात; मात्र वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. या समस्येला आता कायमस्वरूपी लगाम घालण्याच्या दिशेने प्रशासनाने पाऊल उचलले आहे. आंबोलीत अवघ्या आठ दिवसांत वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांना धबधब्यापर्यंत नेण्यासाठी ई-वाहन सेवाही सुरू करण्यात येणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आंबोलीतील वाहतूक व्यवस्था, पर्यटकांच्या सुविधा आणि भविष्यातील पर्यटन नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, दत्तू नार्वेकर यांच्यासह वन, पर्यटन आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रस्त्यावरची पार्किंग आता थांबणार!
आंबोली धबधब्याला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अनेक पर्यटक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून बराच वेळ धबधब्याच्या परिसरात थांबतात. त्यामुळे अरुंद घाटरस्त्यावर वाहनांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी निर्माण होते. घाटरस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने या समस्येची तीव्रता आणखी वाढते.
ही बाब लक्षात घेऊन आंबोली घाट रस्त्यालगतच्या एमटीडीसीच्या जागेत पहिल्या टप्प्यात ७० ते ८० वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. विशेष म्हणजे, ही पार्किंग व्यवस्था येत्या आठ दिवसांत कार्यान्वित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
धबधब्यापर्यंत ‘ई-राईड’
वाहनतळ उभारण्याबरोबरच पर्यटकांना आणखी एक मोठी सुविधा मिळणार आहे. पार्किंगच्या ठिकाणाहून थेट धबधब्यापर्यंत ई-वाहन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आपली वाहने रस्त्यावर न लावता नियोजित वाहनतळात पार्क करता येतील आणि पुढील प्रवास ई-वाहनातून करता येणार आहे.
यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तर दुसरीकडे आंबोलीच्या संवेदनशील निसर्ग परिसरात वाहनांची गर्दी आणि अनावश्यक वाहतूकही कमी होण्याची शक्यता आहे.
भविष्यात पार्किंग क्षमता वाढणार
आंबोलीत वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता ही व्यवस्था केवळ सुरुवातीचा टप्पा राहणार आहे. वन विभागाच्या तसेच उपलब्ध खासगी जागांचा अभ्यास करून भविष्यात अतिरिक्त वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री राणे यांनी दिल्या आहेत.
पर्यटकांची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि पर्यटनाचा दर्जा यांचा समतोल साधत आंबोलीचा पर्यटन विकास करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. त्यामुळे ‘वाहन रस्त्यावर नाही, पर्यटक ई-वाहनातून धबधब्यावर’ या नव्या व्यवस्थेमुळे आंबोलीतील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.






Subscribe to my channel






