धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी युवतीसेनेचे आंदोलन

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा इशारा

मालवण : दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अमानुषपणे झालेल्या लाठीहल्ल्याचा युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सिंधुदुर्गातल्या तरूणाईचा संपुर्ण पाठिंबा आहे. आम्ही नीट आणि टिईटी पेपरफुटीचा तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटीसह विद्यार्थ्यांवर झालेल्या या अमानुष मारहाणीची जबाबदारी स्विकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनी युवती सेना सिंधुदुर्गच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, हिंदुस्थानातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानाची प्रतिष्ठा आणि पेपरफुटी सारख्या युवा भारतीयांच्या आयुष्याशी निगडीत व मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातून विविध संघटनांचे युवा पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान सर्व आंदोलकांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडताना प्रामाणिक विद्यार्थ्यांची मेहनत मातीमोल ठरवणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवला. मात्र उन्मत्त पण तितक्याच भित्र्या भाजप सरकारने या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करून त्यांना रक्तबंबाळ करूनही, अश्रूधुराची नळकांडी फोडूनही हे आंदोलक हटत नाहीत हे लक्षात येताच तथाकथित छप्पन इंची छातीच्या गमजा मारणाऱ्या या सरकारला मात्र अक्षरशः मागल्या दाराने पळ काढावा लागला, अशी टीका निनाक्षी शिंदे यांनी केली आहे

error: Content is protected !!