महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झालेल्या गीतांजली चव्हाणचा सत्कार

वडिलांच्या निधनानंतरही खचली नाही; दुःखावर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर गाठले यश

मालवण : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालणाऱ्या मालवणच्या कन्या कु. गीतांजली चंद्रकांत चव्हाण हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) निवड झाल्याबद्दल रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत तीचा सत्कार करण्यात आला. तिच्या या यशामुळे मालवणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची माजी सिनिअर अंडर ऑफिसर असलेल्या गीतांजलीने पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. एनसीसीमधून मिळालेली शिस्त, आत्मविश्वास आणि मेहनतीची सवय तिच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

मात्र, गीतांजलीच्या या यशामागे संघर्षाची एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. काही महिन्यांपूर्वी अपघातात तिच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगात अनेकदा माणूस खचून जातो; मात्र गीतांजलीने दुःखाला आपली कमजोरी बनू दिले नाही. वडिलांचे स्वप्न, कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वतःच्या ध्येयाची जिद्द मनाशी बाळगत तिने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर आपल्या कर्तृत्वाने यश संपादन केले.

वडिलांच्या निधनानंतरही न डगमगता तिने मिळवलेले हे यश केवळ एका नोकरीपुरते मर्यादित नसून संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे. तिच्या या यशातून प्रतिकूल परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येते, हा संदेश मिळतो.

या यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात ज्येष्ठ शिवसैनिक संजय गावडे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, वृंदा चव्हाण, कविता चव्हाण, अर्चना पाताडे, नेहा चव्हाण, तन्वी चव्हाण, स्निग्धा चव्हाण, अश्विनी चव्हाण, चैतन्य चव्हाण, जगदीश घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी गीतांजलीचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दुःखाच्या सावलीतून यशाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या गीतांजली चव्हाणच्या या कर्तृत्वाचा मालवणवासीयांना अभिमान आहे. तिचा संघर्ष आणि यश अनेक तरुणींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!