दशावतारी कलाकारांचे प्रश्न लवकरच निकाली लागणार

दशावतार कलाकारांची पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा ; वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. सिंधू रत्न योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना वेशभूषा व आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.दशावतार ही कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य वारसा असून, दशावतार सादर करताना कलाकारांना आवश्यक असलेली वेशभूषा, मुकुट, दागिने, आणि अन्य साहित्य स्वतःच्या खर्चातून खरेदी करावे लागते. यामुळे कलाकारांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची बाब प्रतिनिधींनी पालकमंत्री राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधू रत्न योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना वेशभूषा व आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा स्तरावरील कलाकारांच्या विविध प्रश्नांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या आश्वासनामुळे उपस्थित दशावतारी कलाकारांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!