इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेशाची संधी; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत २ डिसेंबर
सावंतवाडी : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या देशभरातील सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE-2027) चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ आहे. प्रवेश परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी देशभरात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी सध्या पाचवीत शिकणारे, तर नववीच्या प्रवेशासाठी आठवीत शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
अशी असेल परीक्षेची पद्धत
प्रवेश परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात पेन-पेपर पद्धतीने ओएमआर उत्तरपत्रिकेवर घेतली जाणार आहे. इयत्ता सहावीसाठी परीक्षेचा कालावधी १५० मिनिटे असून, परीक्षा १३ भाषांमध्ये देता येणार आहे. तर इयत्ता नववीसाठी १८० मिनिटांचा कालावधी असून परीक्षा इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे. परीक्षेचे शहर ११ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होईल, तर प्रवेशपत्र २५ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.
सैनिक स्कूलमधून घडते नेतृत्वक्षम व्यक्तिमत्त्व!
सैनिक शाळांमधील शिक्षण केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्यावर भर दिला जातो. विशेषतः भारतीय संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल हा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक पर्याय आहे.
प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज, माहितीपत्रक, पात्रता निकष आणि अन्य सविस्तर माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या https://exams.nta.nic.in/sainik-school-society या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये मार्गदर्शन कक्ष
दरम्यान, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये या प्रवेश परीक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शन कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठीची पात्रता, प्रवेशाचे निकष, परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९१६७०७७९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.





Subscribe to my channel




