विषय समिती सभापती निवडीसाठी सकाळी विशेष सभा ; भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांना संधी मिळण्याची शक्यता


शिवसेनेच्या सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण यांनाही सभापतीपद, अश्विनी कांदळकर यांची महिला बालकल्याणच्या उपसभापतीपदी वर्णी लागणार ?
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमने सामने आलेल्या शिवसेना व भाजपचे आज नगरपालिकेत खऱ्या अर्थाने मनोमिलन होण्याची शक्यता आहे. पालिकेतील विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण नगरपरिषदेची विशेष सभा पालिका सभागृहात होणार आहे. यावेळी भाजपच्या गटनेत्या सौ. अन्वेशा आचरेकर यांच्याकडे महिला बाल कल्याण समितीचे सभापती पद जाणार असल्याची शक्यता आहे. तर बांधकाम सभापती म्हणून सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती म्हणून शिवसेनेच्या गटनेत्या पूनम चव्हाण व महिला बालकल्याण समिती उपसभापती म्हणून अश्विनी कांदळकर यांची निवड होणार असल्याचे समजते. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडे पाणी पुरवठा समितीचे सभापतीपद जाण्याची शक्यता असून नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे स्थायी समिती अध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याचे समजते. याबाबतचा अंतिम निर्णय आमदार निलेश राणे घेणार आहेत.
मालवण नगरपालिकेच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महायुती मधील शिवसेना व भाजप आमने सामने उभे ठाकले होते. त्यावेळी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे ही निवडणूक राज्यात गाजली होती. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी विजय मिळवला होता. तर २० पैकी १० जागांवर शिवसेनेने आपले नगरसेवक निवडून आणत निर्विवाद सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत भाजपचे ५ नगरसेवक निवडून आले होते. यानंतर झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या दीपक पाटकर यांना संधी देण्यात आली. मात्र भाजपला सत्तेत स्थान मिळाले नव्हते.आता विषय समिती सभापती निवडीच्या निमित्ताने भाजपला सत्तेत वाटा मिळणार असल्याची चर्चा आहे.
आज मालवण नगरपालिकेच्या विषय समिती निवडीसाठी विशेष सभा होत आहे. यावेळी स्थायी समिती सदस्य संख्या ठरवणे, विषय समित्यांची संख्या ठरवणे, समितीतील सदस्यांची संख्या ठरवणे हे विषय देखील घेण्यात येणार आहेत. या विषय समित्यांमध्ये भाजपच्या अन्य नगरसेवकांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.

Subscribe to my channel




