
विनोद सांडव यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाचा पक्षाला मिळणार फायदा
मालवण | कुणाल मांजरेकर
जुन्या काळातील कट्टर शिवसैनिक, क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विनोद सांडव यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नवी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या नव्याने जाहीर झालेल्या विस्तारित कार्यकारिणीत सांडव यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चौकेसह मालवण तालुक्यात ठाकरे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विनोद सांडव हे सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले कार्यकर्ते असून, त्यांची जुन्या काळातील कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांच्याशी त्यांचे प्रदीर्घ काळापासून घनिष्ठ संबंध राहिले आहेत. उपरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पक्षात काम करताना त्यांच्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
तालुकाप्रमुख म्हणून काम करताना सांडव यांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देत कार्यकर्त्यांना जोडण्याचे आणि पक्षाचा विस्तार करण्याचे काम केले. मिळालेल्या जबाबदारीला न्याय देताना त्यांनी संघटनात्मक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्यानंतर विनोद सांडव यांनीही ठाकरे शिवसेनेची वाट धरली. आता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीत त्यांना उपजिल्हा संघटकपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या दीर्घ राजकीय व संघटनात्मक अनुभवाला पक्षाने दिलेली ही महत्त्वाची पावती मानली जात आहे.
संघटन वाढविण्याचा अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रियता या पार्श्वभूमीवर सांडव यांची नियुक्ती पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सांडव यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.







Subscribe to my channel






