
कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात एसीबीने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कथित लाच मागणीची पडताळणी करून सापळा रचला. कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, आरोपीच्या वतीने दाखल जामीन अर्जाच्या सुनावणीत ॲड. सुहास सावंत यांनी पोलीस कोठडीतील चौकशीची आवश्यकता दर्शविणारी सबळ कारणे नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच अटकेच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नसल्याचा आक्षेप बचाव पक्षाने घेतला.
या सुनावणीत ॲड. सुहास सावंत, ॲड. निलांगी सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. रसिका सावंत, ॲड. संदेश कोएगावकर आणि ॲड. धनश्री टेंबुलकर यांनी आरोपीच्या वतीने काम पाहिले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने खेताडे यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यांची मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.







Subscribe to my channel






