
‘श्री कोर्लेचा राजा’, ‘भांब्रेडचा महाराजा’ आणि ‘व्हेळचा राजा’चे घेतले दर्शन; ‘गाव तिथे उद्योजक’चा जठारांचा निर्धार
लांजा : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात आमदार प्रमोद जठार यांनी लांजा तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांशी मनमोकळा संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
लांजा शहरासह कोर्ले, भांब्रेड, वेरवली, व्हेल, हर्दखळे आणि आरगाव परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन आमदार जठार यांनी गणरायाचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध गावांतील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांनी स्थानिक प्रश्न, युवकांच्या संधी आणि गावाच्या विकासाबाबतही चर्चा केली.
यावेळी त्यांनी ‘श्री कोर्लेचा राजा’, ‘भांब्रेडचा महाराजा’ आणि ‘व्हेळचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, समाजहित आणि गावाच्या विकासाला दिशा देणारा उत्सव ठरावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘गाव तिथे उद्योजक’ निर्माण झाले पाहिजेत
यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठार म्हणाले, “सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही केवळ उत्सव साजरा करण्याची केंद्रे न राहता गावाच्या विकासाची आणि युवकांच्या प्रगतीची केंद्रे झाली पाहिजेत. कोकणातील प्रत्येक गावात स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि ‘गाव तिथे उद्योजक’ निर्माण झाला पाहिजे.”
गणेशोत्सव मंडळांनी युवकांना उद्योग, कौशल्य विकास, सामाजिक उपक्रम आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोकणातील तरुणांनी रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करण्याऐवजी आपल्या गावातच उद्योग उभारून स्वतः रोजगार निर्माण करण्यासोबतच इतरांना रोजगार देणारे उद्योजक बनावे, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे जठार यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गावागावांत सकारात्मक वातावरण निर्माण करणे, युवकांना विकासाच्या प्रवाहात आणणे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. गणरायाच्या उत्सवातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करण्याचा संदेश आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी दिला.






Subscribe to my channel






