कितीही लावा शक्ती, किती लढवा युक्ती, कोणी कितीही करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला…

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालवणच्या जाहीर सभेत विश्वास ; नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना

आमदार निलेश राणे यांचे तोंड भरून कौतुक ; मालवणच्या विकासाचा बॅक लॉग भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक असून तुमचे एक मत इतिहास आणि परिवर्तन घडवणार आहे. विकास मंत्रालयात नाही तर मालवणच्या दारात आणायचा आहे. त्यामुळे येत्या २ तारखेला परिवर्तनाची लाट आणत ममता वराडकर यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना विजयी करत मालवण पालिकेवर भगवा फडकवा असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी येथे केले. कितीही लावा शक्ती, कितीही करा कल्ला, मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला, असा विश्वास व्यक्त करून नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. आमदार निलेश राणे यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक करत मालवणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.

मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी येथील टोपीवाला हायस्कूल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आ. राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, काका कुडाळकर, बाळा चिंदरकर, संजय पडते, महेश कांदळगावकर, मनोज राणे, उमेश नेरुरकर, विजय चव्हाण, दिपलक्ष्मी पडते, ममता वराडकर, प्राजक्ता शिरवलकर, मधुरा तुळसकर, संग्राम साळसकर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकासकामे आणि सरकारच्या योजनांवर भर देत महायुतीच्या उमेदवार ममता वराडकर यांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले. निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही. निधीमध्ये जो तुमचा बॅकलॉग आहे तो निश्चितपणे भरून काढणार. रस्ते, पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, गार्डन, खेळाची मैदाने, चांगले नाट्यगृह अशा अनेक लोकाभिमुख प्रकल्पांनी मालवणचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. मी घेणारा नाही तर देणारा मंत्री आहे’ असे सांगत त्यांनी मालवणसाठी अधिकाधिक निधी आणण्याचे वचन दिले.लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या भावाचा आपला शब्द आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे यांचं कौतुक

“इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा.” असे म्हणत त्यांनी निलेश राणे यांना शिवसेनेचे ‘खणखणीत नाणे’ आणि ‘बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमधील महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. निलेश राणे हे पक्षासाठी व मतदारांसाठी ‘जिवाचं रान’ करणारे कार्यकर्ते आहेत, असा गौरव त्यांनी केला. निलेश राणे यांच्यासारखा आमदार मालवणकरांना मिळाला आहे, जो मतदार संघासाठी तळमळीने पाठपुरावा करतो.

बचत गटांना ग्रामीण भागात अनुदान मिळते तसेच शहरी भागातील बचत गटांना देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून भांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणासाठी मुलींनी आत्महत्या करू नये म्हणून मुलींच्या शिक्षणाची ५० टक्के ऐवजी १०० टक्के फी सवलत देण्याचा धाडसी निर्णय आपल्या सरकारने घेतला. कोणी किती लावा शक्ती, किती लढवा युक्ती, कोणी किती करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचा बालेकिल्ला” हा दावा त्यांनी ठामपणे केला. जे बोललो ते करतो, जे होणार नसेल ते बोलत नाही असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची ताकद फक्त उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातच : आ. निलेश राणे

आमदार निलेश राणे यांनी येथील प्रचारसभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मालवणच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली. शहराला ‘२१ व्या शतकातलं शहर’ बनवण्याचे व्हिजन डॉक्युमेंट राणे यांनी यावेळी सादर केले. नगरविकास खाते मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्याने त्याचा अभ्यास करूनच ही मागणी करत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

मागील १० वर्षांत मतदारसंघात मोठा बॅकलॉग तयार झाला असून तो भरून काढण्याची ताकद फक्त उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातच आहे. कोकणाला नगरोत्थानचा निधी फक्त २-३ कोटी मिळतो. या निधीऐवजी सुरुवातीला किमान १०-१० कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली. मालवण हे पर्यटन क्षेत्र असल्याने या निधीतून मामा वरेरकर सांस्कृतिक भवन उभे करणे, तसेच दुर्ग किल्ला आणि किनारपट्टीच्या सुशोभीकरणासाठी काम करणे हे व्हिजन आहे. मालवणला पर्यटन क्षेत्राचा तीर्थक्षेत्राप्रमाणे निधी मिळायला हवा यावर त्यांनी जोर दिला.

आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षाला उजाळा देताना राणे भावूक झाले. मागील १० वर्षांत आपण राजकारणातून बाजूला फेकले गेलो होतो, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला संधी दिली. लोकांनी मला ओवाळून टाकलं होतं. पण ‘मी तुला तिकीट देणार’ सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे होत. अनेक लोकांनी आश्वासनं दिली, पण नंतर नजर चुकवली. निलेश राणेला संधी दिली ती फक्त शिंदे साहेबांनी! शिंदे यांनी दिलेली ही संधी आणि त्यांच्या कामाची ऊर्जा बघूनच आपण पुन्हा जोमाने काम करत असल्याचे राणे म्हणाले.निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले सर्व उमेदवार निष्कलंक असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. जनतेची सेवा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. तुम्ही सत्याच्या बाजूला आहात की भ्रष्टाचाराच्या हे दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केले. शिवसेनेचा कोणताही उमेदवार जनतेच्या खिशाला हात लावणार नाही. माझ्या पक्षातील एकाही उमेदवाराने तुमच्याकडे एक रुपया मागितला, तर मी तुमच्यासमोर नाक घासायलाही तयार आहे!” असा शब्द त्यांनी दिला.निवडणुकीच्या वातावरणात बदल घडवण्यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे निवडणूक आम्ही त्यांच्यामुळे जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कितीही टीका झाली तरी येणाऱ्या ३ तारखेला विरोधकांचे ‘टांगे पलटी’ होऊन शिवसेनाच विजयी होणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!