मनसे नेते अमित ठाकरे सात दिवसांच्या कोकण दौऱ्यावर ; दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गातून
दोन दिवस सिंधुदुर्गात मुक्काम ; मनसे- मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण- तरुणींशी साधणार संवाद
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा कोकण दौरा जाहीर झाला असून तब्बल ५ ते ११ जुलै रोजी ७ दिवस ते कोकणात ठाण मांडून असणार आहेत. या कोकण दौऱ्याची सुरुवात ५ जुलै पासून ते सिंधुदुर्गातून करणार असून ५ ते ७ जुलै पर्यंत ते जिल्ह्यात थांबून तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण – तरुणींशी संवाद साधणार आहेत.
राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने संघटना मजबूत करण्यावर जोर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते अमित ठाकरे आता तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ५ जुलै ते ११ जुलै असा ७ दिवसांचा कोकण दौरा अमित ठाकरे करणार आहेत. या दौऱ्यात ५ आणि ६ जुलै रोजी सिंधुदुर्गात दोन दिवस, ७ आणि ८ जुलै रोजी रत्नागिरीत दोन दिवस आणि रायगडमध्ये ९ ते ११ जुलै असे तीन दिवस (9,10,11 जुलै) अमित ठाकरे तालुका तसंच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसंच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच अमित यांना लवकरात लवकर कोकणातून दौरा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे अमित यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, अमित ठाकरे आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येणार म्हणून कोकणातील महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमित ठाकरे यांच्या कोकण दौरा यशस्वी व्हावा म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठका सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी अमित ठाकरे यांना भेटू शकतील, त्यांच्याशी संवाद साधू शकतील अशा पद्धतीने हे नियोजन सुरू आहे.
मनविसे ही महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनवण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक बैठकीत व्यक्त केला होता. मुंबईत अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाला जबरदस्त प्रतिसाद लाभला आणि हजारो नवीन विद्यार्थी विद्यार्थिनी मनविसेशी थेट जोडले गेले. या विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये मनविसेचे कॉलेज युनिट स्थापन करण्यात येईल असा शब्दच अमित ठाकरे यांना दिला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यार्थिनींनाही आपल्या विद्यार्थी संघटनेत समान संधी देण्यात येणार असल्याचं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केल्यामुळे सुशिक्षित तरुणी खूप मोठ्या संख्येने मनविसेत दाखल होत आहेत. त्यामुळे मनविसेची ताकद वाढली असून आता कोकणात ताकद वाढवण्यासाठी अमित ठाकरे स्वतः हा सात दिवसांचा कोकण दौरा करीत आहेत.