“जय भवानी… जय शिवाजी” च्या जयघोषात मनसेकडून किल्ले सिंधुदुर्गवर शिवजन्मोत्सव
पिंगुळी ते मालवण पर्यंत मोटरसायकल रॅली ; ढोलताशांच्या गजरात महाराजांना अभिवादन
कुणाल मांजरेकर
मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी तिथीनुसार आलेली शिवजयंती सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंगुळी ते कुडाळ- ओरोस मार्गे मालवण पर्यंत मोटरसायकल रॅली काढून ढोलताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषात किल्ले सिंधुदुर्गवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव अशा शिवराजेश्वर मंदिरात यावेळी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात २१ मार्च रोजी तिथीनुसार येणारी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार सोमवारी पिंगुळी येथून मोटरसायकल रॅली सुरू करण्यात आली. त्यानंतर कुडाळ आणि ओरोस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर कुंभारमाठ येथे शिवपुतळ्याला पुष्पहार करण्यात आला. यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवराजेश्वर मंदिरात मनसैनिकांनी महाराजाना अभिवादन केले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “राजसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, शैलेश अंधारी, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, गुरु तोडणकर, विजय पेडणेकर, गणेश गावडे, अभिजित दळवी, राजेश परब, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, बाळा पावसकर, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, अविनाश अणावकर, सत्यविजय कविटकर, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, रामा सावंत, अनिल कसालकर, प्रमोद परब, आपा मांजरेकर, सर्वेश राणे, गौरव कुडाळकर, वैभव धुरी आदी उपस्थित होते.