… तर आगामी निवडणूक लढणार नाही ; सतीश सावंतांचं खुलं आव्हान !
जिल्हा बँक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा असा असेल फॉर्म्युला
मालवणात पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मागील साडेसहा वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सांभाळताना सर्वांना विश्वासात घेऊन आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही काम केलं आहे. त्यामुळेच भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर झाला नाही. आमच्या कालावधीत सभागृहात परिपूर्ण असलेला एकही प्रस्ताव राजकिय हेतूने आम्ही नाकारला नाही, आमच्यावर राजकीय आरोप करणाऱ्यांनी असे एकतरी प्रकरण दाखवून द्यावे, मी जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार नाही, असं खुलं आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिलं आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असून जागा निवडून येण्याची क्षमता हाच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल, अशी माहितीही श्री. सावंत यांनी दिली.
तारकर्ली येथील जिल्हा बँकेच्या शाखेचा स्थलांतर सोहळा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सतीश सावंत यांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. यावेळी बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मधुरा चोपडेकर यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी मार्फतच लढविली जाणार आहे. मात्र आमच्यात जागावाटपाचा कोणताही वेगळा फॉर्मुला ठरलेला नाही. निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा फॉर्म्युला असेल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील सहकार टिकवणे, जिल्हा बँकेला आर्थिक उन्नतीकडे नेणे आणि बँकेच्या खातेदारांना सुविधा देणे याकडे आमचा प्रामुख्याने लक्ष असेल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यंदा भाजपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे याबाबत विचारले असता भाजपाला निवडणुकीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कोणत्याही ठिकाणी विरोधक पाहिजे तरच त्या संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक होऊ शकतो. म्हणून बँकेत विरोधी बाकांवर बसण्यासाठी भाजपाला आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला सतीश सावंत यांनी लगावला. मागील साडेसहा वर्षे बँकेचा कारभार सांभाळताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप आम्ही होऊ दिला नाही. या कालावधीत बँकेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सांघिक प्रयत्न केले. त्यामुळेच आज महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे. जिल्हा बँकेमार्फत बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना ९ टक्के व्याजदरावर राबविली जात आहे. आज राष्ट्रीय बँका शैक्षणिक कर्ज १२ टक्के व्याजदराने देत असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशातील एकमेव कमी व्याजदरावर शैक्षणिक कर्ज देणारी बँक ठरल्याचे ते म्हणाले. या शिवाय शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप आम्ही केले आहे. एकूण आकडेवारीच्या ६० टक्के कर्ज वाटप एकट्या जिल्हा बँकेने केले असून उर्वरित सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ४० टक्क्यांपर्यंत कर्ज वाटप केल्याचे ते म्हणाले. बँकेच्या यशाचा आलेख नेहमीच वरचढ ठरला असून सिंधुदुर्ग बँकेच्या कार्याने प्रभावित होऊनच सातारा जिल्हा बँकेने आमच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पाहणी दौरा केला. सात ते आठ दिवसात आणखी दोन ते तीन जिल्हा बँका आमच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी येत असल्याचे सावंत म्हणाले.