सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आई माहेरी असताना घडला संतापजनक प्रकार; तक्रार होताच आचरा पोलिसांची कारवाई, संशयिताला अटक

मालवण : मालवण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आचरा पोलिस ठाण्यात संशयितावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. त्यावेळी रात्रीच्या सुमारास राहत्या ठिकाणी सावत्र वडिलांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

आई माहेरहून परतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने १७ सप्टेंबर रोजी आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास आचरा पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!