वायरी किनारपट्टीवरील रस्त्यातील प्रकार ; हरी खोबरेकर यांनी केला पर्दाफाश


स्वतःची पोटे भरण्यासाठी केलेली निकृष्ट कामे खपवून घेतली जाणार नाही : हरी खोबरेकर यांचा इशारा
मालवण : तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्ता काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. नागरिकांची गरज लक्षात घेता हे काम पूर्ण होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सातत्याने मागणी केली जात होती. नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम आता सुरू झाले आहे. मात्र या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे. या कामाच्या काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर होत असल्याचा प्रकार श्री. खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिला आहे.
खोबरेकर यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यासाठी काँक्रीटची साईड वॉल आहे. या वॉलमध्ये लॅटेराईट दगडा ऐवजी जांभ्यादगडाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची वाळू वापरण्यात आली असल्याचे खोबरेकर म्हणाले.नागरिकांच्या गरजेसाठी अनेक वर्ष मागणी करून, पाठपुरावा करून विकास कामे मंजूर होत असतात. त्यामागे नागरिकांचे मोठे प्रयत्न असतात. अशावेळी ठेकेदारीतून आपले घर चालविण्या ऐवजी जनतेच्या हितासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजकार्यातून जनतेची विकास कामे करताना त्यात आपला व्यवसाय पहायचा नसतो. प्रत्येकाला ठेकेदारी करण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेच्या विकास कामात कोणते प्रकारचा भ्रष्टाचार बोगसपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आंदोलन छेडण्यात येईल. जनतेच्या हितासाठी आमचा पक्ष आणि आमचे शिवसैनिक नेहमीच जागरूक असणार असल्याचेही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले.
















Subscribe to my channel




