गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने बहरले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प


अक्कलकोट : श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल युवा कीर्तनकारांची उत्कृष्ट कीर्तने स्वामी दरबारात संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील रंगल्याने गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प बहरले.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी उत्सव धर्मसंकीर्तन महोत्सवात आज दुसरे पुष्प बालयुवा कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकरह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांची एकाचवेळी कीर्तनं संपन्न झाली. या चक्री कीर्तन सेवेतून त्यांनी पुर्व रंगात आपल्या कीर्तनातुन नश्वर मनुष्य देहाच्या उन्नतीसाठी देवभक्ती, देशभक्ती, व गुरु भक्ती अंगी रुजविण्यासाठी आपल्या जीवनातील कांही वेळ द्यावा असे आवाहन केले. अनेक राष्ट्रपुरूष व समाज सुधारकांनी त्यांच्या जीवनातील जवळपास सर्वच वेळ समाजासाठी अर्पण केला, म्हणुन आज आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत, पण त्यात विकारी वृत्तीने धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त प्रमाणात होत असून याचा परिणाम समाजाच्या नुकसानीत आहे. समाज संघटीत झाला तर असे बिकट प्रसंग निर्माण होणार नाहीत. माणसात नराचा नारायण होण्याची क्षमता आहे त्यासाठी योग्य साधन आपणास पाहिजे हे साधन फक्त संत चरित्राचा आभ्यास व आचरणातुन मिळेल असे विवेचन केले. कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात संत चरित्र समजून घेवून त्याचं आचरण झालं तर समाज प्रगतशील होईल असेही विचार त्यांनी अनेक समाज पुरुष व संतांची दाखले देवुन व्यक्त करीत वेगवेगळ्या देव, देश, धर्म, संस्कृती तसेच हिंदू संस्कार, संताचे विचार, संत चरित्र, देश भक्तीचे विचार या चक्री कीर्तनात सांगितले. या कीर्तन सेवेत कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर, ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांना तबल्यावर उमेश नाईक, हार्मोनियमवर सुहास वझे, चिपळी साथ संदीप गावकर, दामोदर कामत यांनी साथ संगत केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, अक्षय सरदेशमुख, अमर पाटील, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, एम.बी.पाटील सर, प्रसाद पाटील सर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, गिरीश पवार, संतोष पराणे, संजय पवार, मोहन जाधव, तुषार मोरे, बाळासाहेब एकबोटे आदींसह अनेक पुरुष व महिला स्वामी भक्त उपस्थित होते.
















Subscribe to my channel




