मुदत संपली… पण जनसेवेचं व्रत सुरूच ; यतीन खोत यांचं होतंय कौतुक !
टोपीवाला हायस्कूल नजीकच्या रस्त्यावर मोडून पडलेला माड हटवला
कुणाल मांजरेकर
मालवण : राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी नगरपरिषद सदस्यांची मुदतही संपून पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र मालवणात माजी नगरसेवक यतीन खोत यांनी आपल्या कामातून स्वतःचा आदर्श निर्माण केला आहे. रविवारी सकाळी टोपीवाला हायस्कूल नजीक रस्त्यावर मोडून वाहतूक खोळंबल्याचे समजताच यतीन खोत यांनी तात्काळ येथे धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने हा माड रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. नगरसेवक पदाची मुदत संपली तरी जनसेवेचा घेतलेला वसा अद्यापही कायम असल्याचे यानिमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे. याबाबत यतीन खोत यांचे कौतुक होत आहे.
शहरातील टोपीवाला हायस्कूल नजीक माघी गणेश चौक ते कोळंब मार्गावर शांती कुटीर येथे माडाचे झाड पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक नंदा सारंग यांनी माजी नगरसेवक यतीन खोत यांना दिल्यानंतर यतीन खोत यांच्यासह उत्तम मालवणकर, श्रीकांत अटक, गुरुनाथ वराडकर, मच्छिन्द्रनाथ गोसावी, उदय कांबळी यांनी हा मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करून दिली. नगरपरिषदेचे वाहन बोलावून तात्काळ हे माडाचे झाड बाजूला करण्यात आले.