बी.एस्सी नर्सिंग प्रवेशाबाबत भारतीय नर्सिंग कौन्सीलचा मोठा निर्णय

प्रवेशासाठीच्या पात्रतेतील टक्केवारीची अट शिथिल ; प्रवेशाची अंतिम तारीख देखील वाढवली

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिये बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या १७ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार प्रवेशासाठीच्या पात्रतेतील टक्केवारीची अट शिथिल करण्यात आली असून प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी खाजगी नर्सिंग स्कूल अँड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुक्त अनिल भंडारी यांच्याकडे केली होती. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या १७ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार प्रवेशासाठीच्या पात्रतेतील टक्केवारीची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, कॅप-३ नंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी कॅप-४ फेरी घेण्यात येणार आहे. यामध्ये बीएस्सी नर्सिंग सीईटी २०२५ परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार सहभागी होऊ शकतात. नोंदणी प्रक्रिया २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार असून या दरम्यान उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करणे, नोंदणी शुल्क भरपाई आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहील. २९ सप्टेंबर रोजी नोंदणीकृत उमेदवारांची व मेरिट लिस्टची घोषणा करण्यात येईल. सीईटी सेलच्या माहितीनुसार, कॅप ४ नंतरही जर रिक्त जागा उरल्या तर पुढील फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या निर्णयामुळे पात्रतेत शिथिलता मिळाल्याने आणि अंतिम मुदत वाढवल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य सीईटी सेलचे आयुक्त व सक्षम प्राधिकारी दिलीप सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!