४२७ कोटींच्या पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यातील कामावरही राहणार स्थानिक स्तरावर देखरेख
वैद्यकीय महाविद्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय ओरोस येथे मंजूर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; राज्य शासनाची हिरवा कंदील
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीला आता प्रशासकीय स्तरावर अधिक गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामावर प्रभावी नियंत्रण, नियमित देखरेख आणि क्षेत्रीय स्तरावर समन्वय राखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी यासाठी केलेल्या मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी तब्बल ४२७.५६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात १ लाख ८१ हजार १४९.७३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ८१ हजार २६३.३६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित असून, त्यासाठी ६२५.९४ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.इतक्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे प्रभावी नियोजन, प्रत्यक्ष बांधकामाची गुणवत्ता व प्रगती यावर नियंत्रण आणि प्रशासकीय समन्वय अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर संबंधित कार्यालय कणकवली येथून सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, ‘उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (वैद्यकीय महाविद्यालय), सिंधुदुर्गनगरी (ओरोस)’ या नावाने स्वतंत्र कार्यालय कार्यरत होणार आहे. कणकवली येथील या विभागाकडे मंजूर असलेल्या पदांसह हे कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार असून, या निर्णयामुळे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.
यापूर्वी हे कार्यालय अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत होते. आता ते अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली आणण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या नियंत्रणाखाली हे कार्यालय काम करणार आहे.
नवीन कार्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहेत.या स्वतंत्र कार्यालयामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामावर स्थानिक पातळीवर नियमित देखरेख ठेवणे, कामातील अडचणींचे तातडीने निराकरण करणे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीला प्रशासकीय बळ मिळणार असून, सिंधुदुर्गच्या आरोग्य सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे स्वतंत्र कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीला आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





Subscribe to my channel




