स्वातंत्र्यानंतर जनतेत सकारात्मक परिवर्तन आणणे हाच मोदी सरकारचा उद्देश …

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे मालवणात प्रतिपादन : मालवणात दर्याराजाला श्रीफळ अर्पण

मालवण | कुणाल मांजरेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या मालवण नगरीत येऊन आपला उत्साह वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपला देश, स्वराज्य पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत त्या त्या काळातील राजा, महाराजांनी प्रयत्न केले. याच भावनेतून स्वातंत्र्यानंतर जनतेत सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात काम सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी मालवण येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. ना. मिश्रा यांच्या हस्ते यावेळी श्रीफळाची विधिवत पूजा करून तो दर्याराजाला अर्पण करण्यात आला.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी गुरुवारी सायंकाळी मालवण नवीन बंदर जेटी येथे भेट देत किल्ले सिंधुदुर्ग बाबत माहिती जाणून घेतली. तसेच नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवण बंदर जेटी येथे समुद्रात त्यांनी श्रीफळ अर्पण केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अशोक सावंत, अतुल काळसेकर, बाबा परब, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, बंड्या सावंत, संध्या तेरसे, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पूजा वेरलकर, बाबा मोंडकर, बबलू सावंत, ललित चव्हाण, राजू बिडये, मोहन कुबल, दादा वाघ, किल्ले अभ्यासक ज्योती तोरसकर, पुरोहित किरण आपटे यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. मालवण किनारपट्टी वरील सीआरझेड प्रश्नी शिथिलता मिळू शकते का ? याबाबत संबंधित खात्याच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रस्तरीय बैठक घेऊ. असे मंत्री मिश्रा यांनी सांगितले. येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!