सिंधुदुर्ग किल्ला आपला अभिमान… येथील अस्वच्छता दुर्दैवी !
किल्ला पाहणीनंतर सुप्रिया सुळे यांनी मांडलं मत ; आमदार, खासदार, पालकमंत्र्यांसह चर्चा करणार
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग किल्ला हा आपला अभिमान आहे. या किल्ल्याची स्वच्छता महत्त्वाची असून आज या ठिकाणी सर्वत्र प्लास्टिक आणि कचरा पडलेला दिसतो, हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे. महाराजांचे किल्ले म्हणजे आपला इतिहास आहे. त्यामुळे तो स्वच्छ राहिलाच पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. याबाबत स्थानिक पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या किल्ल्याची स्वच्छता ठेवण्याबाबत मी विनंती करणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी दुपारी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन पाहणी केली. पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत जवळपास तासभर सुप्रियाताईंनी गाईड समवेत किल्ला फिरून किल्ल्याबाबत सखोल माहिती घेतली. यावेळी सौ. ज्योती तोरसकर यांनी देखील सुप्रिया सुळेना किल्ल्याच्या इतिहासाबाबत विस्तृत माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी किल्ल्यातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. हा किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. त्यामुळे या किल्ल्याला वेगळा इतिहास आहे. हा इतिहास जपण्यासाठी स्थानिक नागरिकांनी देखील हातभार लावणे आवश्यक आहे. ही वास्तू अतिशय सुंदर आहे, हा किल्ला म्हणजे महाराष्ट्राचा आणि देशाचा अभिमान असून तो सुंदर राखलाच पाहिजे. महाराष्ट्रात पुरंदर सारख्या किल्ल्याचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे राज्यातील सर्व खासदार, आमदारांनी एकत्र येऊन दिल्लीत केंद्र सरकार आणि पुरातत्व खात्याशी चर्चा केली तर येणाऱ्या पिढीला हा इतिहास दाखवता येईल, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही सुप्रियाताईंनी सांगितले.