मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा १९ जानेवारी पासून २१ वा वर्धापन दिन सोहळा

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम ; श्री गणेश आरती, महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा, अभंग स्पर्धेचेही आयोजन

मालवण : मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा १९, २० व २१ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जय गणेश मंदिर देवस्थान तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

येथील चिवला बीच हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी जय गणेश मंदिर देवस्थान तर्फे संजय शिंदे, प्रकाश कुशे, भालचंद्र केळूसकर, शैलेश लुडबे यांनी उपस्थित राहून वर्धापन दिन सोहळ्याविषयी माहिती दिली. २००५ साली ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी मेढा येथील आपल्या घराच्या जागेत श्री गणेशाचे मंदिर उभारले. या मंदिरात पंचधातूपासून बनविलेल्या आणि त्यावर सोने चढविलेल्या श्री गणेश आणि रिद्धी, सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिर उभारणीनंतर मालवणचा कायापालट होईल असे भाकीत जयंत साळगावकर यांनी त्यावेळी केले होते. आज हे भाकीत खरे ठरले असून जय गणेश मंदिर पर्यटनदृष्ट्या मोठे आकर्षण ठरले असून भारतभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात.

या मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा जानेवारी २०२६ मध्ये साजरा करण्यात येणार आहे. श्री गणेशाच्या दृष्टीने २१ या अंकाला मोठे महत्व असल्याने २१ वा वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. जयंत साळगावकर यांचे सुपुत्र जयेंद्र साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

यानिमित्त दि. १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ ते ५.३० वाजता नांदी व सुश्राव्य गायन, संध्याकाळी ५.३० ते रात्री ८ वाजता गणेश आरती स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा मालवण तालुक्यातील शाळांसाठी असून पहिला गट- इयत्ता ५ वी ते ७ वी, दुसरा गट- इयत्ता ८ वी ते १० वी असे गट आहेत. प्रथम येणाऱ्या १० स्पर्धक संघाना सहभाग मिळेल, एका संघात सहभागी स्पर्धक संख्या किमान ५ व कमाल ८ असेल, कोणत्याही एका आरतीचे सादरीकरण करावे, पारंपरिक वाद्यांची संगीत साथ असेल-पेटी, पखवाज, टाळ व आरतीची चाल सिनेसंगीतवर किंवा तत्सम नसावी. या स्पर्धेसाठी पहिल्या गटात प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये तसेच उत्तेजनार्थ अनुक्रमे ५००, ५०० रुपये दुसऱ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये उत्तेजनार्थ अनुक्रमे १०००, १००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

२० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश आरती स्पर्धेतील खुल्या गटाची स्पर्धा होणार असून यामध्ये २० वर्षे वयांवरील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५०००, ३००० रुपये, उत्तेजनार्थ अनुक्रमे १५००, १५०० रुपये, अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर रात्री ९ वाजता दशावतारी नाटक सादर होणार आहे.

रात्री प्रसिद्ध दशावतार कलाकार नितीन आशयेकर यांच्या देवी भूमिका दशावतार लोकनाट्य कला मंडळ यांचा बाळूमामा यांच्यावर आधारित दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर २२ जानेवारी रोजी खुल्या गटाची अभंग स्पर्धा होणार असून १५ संघांना प्रवेश देण्यात येईल, तसेच विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १५०० रुपये आणि उत्तेजनार्थ तीन बक्षिसे १००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तरी सर्वांनी या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी व्हावे, स्पर्धकांनी स्पर्धामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!