“आकाशापल्याड आणखी आकाश” ; नव्या पर्वासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया


मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सौ. खोत यांनी या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांप्रति शत प्रतिशत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान केलेल्या सर्व मालवणवासियांचे मनःपूर्वक आभार. जवळपास नऊ वर्षांनंतर पुन्हा नव्याने ऊर्जितावस्था मिळालेल्या लोकशाहीच्या या उत्सवाचे आपण सगळेच ‘ब्रॅन्ड ॲम्बॅसेडर’ होता. व्यक्तिशः मला, जवळपास साडेतीन वर्षे, शहरात असलेल्या प्रशासकीय कालावधीपासून निवडणूक प्रक्रियेपर्यंत लोकशाहीच्या विचारधारेला किंवा लोकविचारधारेला प्रसन्न ठेवायचं काम अगदी जवळून करता आले याचा मनापासून आनंद आहे. नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक ही त्याच प्रक्रियेतील एक कर्तव्य होते. मालवणात लोकांशी जोडलं जात असताना, लहान थोर सर्वांच्याच समस्या, गरजा, आनंद आणि दुःख लक्षात येत गेली आणि त्यातूनच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा आग्रह देखिल स्विकारताना दडपण आलं नाही. नगराध्यक्ष पदाचं जनतेचं दान जरी मिळालेलं नसलं तरीही एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी स्वतःला सर्वांसोबत सक्रीय करायचा प्रवास हा आगामी काळातील अनेक सकारात्मक घडामोडींची मूहूर्तमेढ ठरला आहे.
दरम्यान, समाजकारणातून राजकारणाकडे जाताना ‘सर्वांगीण क्षमतेचा’ कस लागतो याचीही वेगळी अनुभूती आली आणि आपण सर्वांनी बहाल केलेला ‘संयमी आत्मविश्वास’ हा दागिना मला बहाल केला त्याबद्दलही मनापासून कृतज्ञता.
आकडे, पराभव किंवा संख्यात्मकतेपेक्षा, आता मालवण वासियांशी अधिक घट्टपणे जोडले जात असल्याची प्रामाणिक भावना आहे. निवडणूका ह्या ‘प्रेम किंवा युद्ध’ नाहीत तर त्या सर्वांना सिद्ध करायची, सिद्ध रहायची व सिद्ध असायची एक वेगळीच शक्ती देतात आणि ती शक्ती मी आत्ताही अनुभवते आहे. त्याच शक्तीला प्रवाहीत राखण्यासाठी आपण सदैव पाठिशी आहातच याबद्दल खात्री आहे. लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभाग व योगदान दिलेल्या सर्वांना वंदन.
‘आकाशापल्याड आणखी आकाश आहे,’ ह्या जाणीवेत उगवत असलेल्या माझ्या आपल्यासोबतच्या नव्या पर्वासाठी मी सज्ज आहेच…! पुनश्च सर्वांना मनापासून धन्यवाद आणि मला कणाने, मनाने आणि आनंदाने सहकार्य केलेल्या प्रत्येकाची ‘शत प्रतिशत कृतज्ञता… असे शिल्पा खोत यांनी म्हटले आहे.
















Subscribe to my channel




