मालवणात स्वातंत्र्यदिनी पालिकेसमोर ‘उपोषणाचा एल्गार’; प्रशासनाची यशस्वी शिष्टाई !

नळपाणी, भुयारी गटार, अतिक्रमणे अन् दोन कोटींच्या कचरा ठेक्यावरून घणाघाती सवाल; मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

मालवण : मालवण शहरातील रखडलेली विकासकामे, नागरी समस्यांचा वाढता विळखा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील कथित अनागोंदी कारभाराविरोधात स्वातंत्र्यदिनी पालिका प्रशासनाविरोधात ‘उपोषणाचा एल्गार’ करण्यात आला. उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी मालवण नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण छेडत प्रशासनाला धारेवर धरले. विविध प्रलंबित प्रश्नांवर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा शिवसेना, मनसे, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

नळपाणी योजनेच्या कामावर नियंत्रण कुणाचे?’

मालवण शहरासाठी मंजूर नळपाणी योजनेच्या कामावर मयेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. निविदेतील अटी व शर्तीनुसार काम होत नसल्याचा आरोप करत योजनेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेच्या प्रमुख व्यक्तींचे ठेकेदाराशी जवळचे नाते असल्याने कामाच्या दर्जावर योग्य नियंत्रण ठेवले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी तक्रारी करूनही प्रशासनाने चौकशी अथवा कारवाई केली नसल्याचा आरोप करत मयेकर यांनी संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केला.

२० वर्षे भुयारी गटार योजना रखडली; निधी गेला कुठे?

मालवणची भुयारी गटार योजना तब्बल दोन दशकांपासून अपूर्ण असल्याचा मुद्दा आंदोलनात उपस्थित झाला. योजना नेमकी का रखडली? कामाची मुदत किती होती? शासनाकडून किती निधी मिळाला? किती निधी खर्च झाला? याची स्पष्ट माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी मयेकर यांनी केली. पाठपुरावा करूनही ठेकेदारावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत ठेकेदाराला सोबत घेऊन प्रशासनाने आढावा बैठक घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

देऊळवाडा-भरड रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात!

मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील देऊळवाडा ते भरड हा महत्त्वाचा रहदारीचा मार्ग अनधिकृत बांधकामे आणि स्टॉलच्या विळख्यात सापडल्याचा आरोप मयेकर यांनी केला. या अतिक्रमणांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अनधिकृत स्टॉलधारकांकडून हप्ते वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. रस्त्यालगतची सर्व अनधिकृत बांधकामे व स्टॉल तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी केली.

दोन कोटींचा कचरा ठेका; तरीही ‘जैसे थे’!

शहरातील कचरा व्यवस्थापनावरूनही प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. पूर्वी काही लाख रुपयांत होणारा घरोघरी कचरा संकलनाचा ठेका यावेळी तब्बल दोन कोटी रुपयांचा करण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवक मंदार ओरसकर यांनी उपस्थित केला. “ठेका दोन कोटींचा; पण काम मात्र पूर्वीसारखेच!” असा सवाल करत निविदेतील अटी व शर्तीनुसार काम होत नसतानाही संबंधित ठेकेदाराला बिले दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. एवढा मोठा खर्च करूनही शहरातील कचरा व्यवस्थापनात अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे सांगत ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोपही ओरसकर यांनी केला.

मुख्याधिकारी उपोषणस्थळी; चर्चेनंतर लेखी आश्वासन

दरम्यान, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तपस्वी मयेकर व उपस्थितांशी सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर प्रशासनाने विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासनाचे पत्र मयेकर यांना दिले. नळपाणी आणि भुयारी गटार योजनेबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने नगराध्यक्षांशी चर्चा करून एका महिन्याच्या आत सविस्तर आढावा बैठका घेण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. देऊळवाडा ते भरड रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासनही देण्यात आले. घरोघरी कचरा संकलनाच्या कामाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले.

आश्वासन पाळा, अन्यथा तीव्र आंदोलन !

’प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तपस्वी मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, “ही केवळ आश्वासने न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, हरी खोबरेकर, बाबी जोगी, अनिता गिरकर, नितीन वाळके, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपूटे, गॅरी अन्ननसीएशन, गणेश वाईरकर, सागर जाधव, बाळू अंधारी, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण, राधिका मोंडकर, निनाक्षी शिंदे, रूपा कुडाळकर, आर्या गावकर, गौरी सावंत, जयमाला मयेकर, उमेश मांजरेकर, ॲड. सुमित जाधव, उमेश चव्हाण, हेमंत मोंडकर, विनायक कोळंबकर, कमलाकर खोत आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

error: Content is protected !!