दातृत्वाची ‘दृष्टी’, सेवाभावाची ‘ज्योती’!

सहदेव बापर्डेकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ८० गरजू नागरिकांना मोफत चष्मे

राजकोट मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सहकार्याने उपक्रम

मालवण : सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि जनहिताची तळमळ जपत विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविणारे मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांनी आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त सेवाकार्याचा अनोखा आदर्श घालून दिला. त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरातील ८० गरजू नागरिकांना मंगळवारी आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय, मालवण येथे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ‘सहदेव बापर्डेकर हे दातृत्वाचा अखंड वाहणारा झरा आहेत,’ अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस ३ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नेत्र तपासणी शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी ज्या रुग्णांना चष्म्याची आवश्यकता होती, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर ८० लाभार्थी नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे दृष्टीदोषाचा सामना करणाऱ्या गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजाच्या उपयोगी कसा ठरेल, याचा आदर्श सहदेव बापर्डेकर यांनी या उपक्रमातून घालून दिला आहे. सामाजिक, आरोग्य, पर्यावरण तसेच गरजू नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

नगराध्यक्षा ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह उपस्थितांनी सहदेव बापर्डेकर यांच्या वतीने सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. नागरिकांच्या आरोग्याची गरज ओळखून गरजू व्यक्तींना मोफत चष्मे उपलब्ध करून देणे हा अत्यंत कौतुकास्पद आणि समाजोपयोगी उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती तथा लायन्स क्लब सचिव पूनम चव्हाण, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, सुनील खांदारे, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर, राजू बिडये, जॉन नोरोना, शेखर गाड, भाई मांजरेकर, महेश सारंग, गणेश परब, मयू पाटकर, किसन मांजरेकर, दिलीप बिरमोळे, संजय नार्वेकर, पारितोष बापर्डेकर, रूपा बिडये यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!