पर्यटकांच्या बसच्या धडकेत विद्यार्थाला गंभीर दुखापत ; संतप्त ग्रामस्थांची बसचालकाला मारहाण

चौके गोड्याचीवाडी येथील घटना ; सुसाट वाहनचालकांना आवर घालण्याची मागणी


चौके (प्रतिनिधी)
मालवणवरुन पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या बसने शाळेतून घरी परतणाऱ्या १२ वर्षीय मुलाला धडक दिल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास चौके गोड्याचीवाडी येथील बसस्टॉप नजीक घडली. या दुर्घटनेत बसची चाके विद्यार्थ्याच्या पायावरुन गेल्याने दोन्ही पायाना गंभीर दुखापत झाली असून दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांकडून देण्यात आली.

मालवण पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या टुरीस्ट बसचालक हरी मात्रु करंगुटकर (रा.म्हापसा शिवोली) यांच्या ताब्यातील GA-03 W -9810 या बसने मंगळवारी सांयकाळी चौके गोड्याचीवाडी येथे शिवाजी विद्यामंदिर काळसे या शाळेतून आपल्या घरी निघालेल्या सहावीत शिक्षण घेणाऱ्या कु. निनाद नारायण मांडलकर या १२ वर्षीय विद्यार्थ्यांला चौके-गोड्याचीवाडी येथे रस्ता ओलंडताना जोरदार धडक दिली. यात निनादच्या दोन्ही पायावरुन प्रवासी भरलेली बस गेल्याने गंभीर दुखापत झाली. तेथील ग्रामस्थ प्रभाकर परब, गौरव मांडलकर, विश्राम कदम तसेच चौके येथील बंड्या गावडे, गोट्या गावडे यांनी तत्काळ धाव घेत या शालेय विद्यार्थ्यांला अधिक उपचारासाठी कुडाळ येथे नेले. यावेळी घटनास्थळी उपस्थितांनी बसच्या चालकाला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस संतोष पुटवाड, सराफदार यांनी घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास करत आहेत.

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण केली.

गोव्याहून येणारे वाहनचालक सुसाट

गोव्यावरुन मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्गात पर्यटनासाठी पर्यटक घेऊन येणारे वहानचालक सुसाट असतात. या वाहनचालकांकडून अनेक अपघात होत असतात. यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!