आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट; १८ वर्षांच्या प्रतीक्षेला मिळणार चालना

मंत्री नितेश राणे उद्या करणार प्रत्यक्ष पाहणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांचा घेणार आढावा

देवगड : देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या रखडलेल्या विकासाला आता निर्णायक गती मिळणार आहे. तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आनंदवाडी मत्स्यबंदराची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार असून, प्रस्तावित विकासकामांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.

आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत जेटीचे बांधकाम, कार्यशाळा, जाळी विणण्याचे शेड तसेच गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. उर्वरित कामांनाही आता वेग देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मत्स्यबंदराच्या विकास आराखड्यात मासळी लिलावगृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, उपहारगृह, मच्छीमारांसाठी विश्रांतीगृह तसेच रेडिओ वॉरन कम्युनिकेशन सेंटर यांसह विविध सुविधांचा समावेश आहे. ही सर्व कामे आगामी १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा महामंडळाचा मानस आहे.

शुक्रवारी होणाऱ्या पाहणीदरम्यान बंदरातील सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, आवश्यक सुविधा आणि पुढील नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच विकासकामांचे सादरीकरण करून प्रकल्पाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होणार आहे.

या पाहणीसाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, कार्यकारी अभियंता कृष्णात निकम, प्रशासकीय अधिकारी किशोर साळगावकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुंवेसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.आनंदवाडी मत्स्यबंदराचा विकास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील मच्छीमारांना आधुनिक आणि आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, मासळी व्यवसाय, मत्स्यउद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे १८ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला आता प्रत्यक्ष ‘उर्जितावस्था’ मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या पाहणी कार्यक्रमाला मच्छीमार बांधव, ग्रामस्थ आणि संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!