नेत्रतज्ञाचे यशस्वी प्रयत्न : महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार


चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हा अवयव म्हणजे संपूर्ण जग पाहण्याकरिता उपयोगी असणारे डोळे आहेत. नेत्रतज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर बुबूळ प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत झाली असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ.सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
वालावलकर रुग्णालयातील आयसीयू मधील एक रुग्ण ३ सप्टेंबर रोजी मरण पावला. त्याच्या नातेवाईकांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच तात्काळ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रियांका पाटील व त्यांचे सहकारी यांनी त्या रुग्णाचे दोन्ही डोळे नेत्रदाना करिता स्वीकारले. यानंतर सर्व गरजवंत अंध असलेल्या रुग्णांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला. त्यापैकी एक रुग्ण शस्त्रक्रिया करण्याकरिता सहमत झाला. हा पेशंट बऱ्याच वर्षांपासून अंध होता. त्याच्या डाव्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी मार लागल्यामुळे समोरील दृष्टीपटल म्हणजेच कॉर्निया हा पांढरा पडला होता. तो पारदर्शक राहिला नव्हता. त्यामुळे रुग्णाला काहीही दिसत नव्हते. तसेच पेशंटला मोतीबिंदू ही झाला होता. तो मोतीबिंदू पिकून फुटण्याच्या मार्गावरती होता. त्यामुळे या बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसोबतच मोतीबिंदूची ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. म्हणून ११ सप्टेंबर रोजी ही गुंतागुंती आणि अवघड अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत अनुभवी नेत्रशल्यचिकित्सक डॉ. मनीषा वाघमारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सागर पाटील व डॉ. भूषण इंगवले यांनी त्यांना सहकार्य केले. भूलतज्ञ डॉ. लीना व त्यांचे इतर सहकारी यांनी पेशंटला भूल देण्याचे काम केले.
नेत्रदान करण्याकरता नातेवाईकांनी काय करायला हवे ?मृताचे डोळे अर्धवट मिटलेले असतील तर ते पूर्ण बंद करावेत. डोळे कोरडे पडू नये यासाठी त्याच्यावरती थंड पाण्याची पट्टी ठेवावी. मृताचे डोके थोडेसे उंच करून उशीवर ठेवावे. खोलीतील पंखे बंद ठेवावे. मृत्यूनंतर आपल्या फॅमिली डॉक्टर कडून मृत्यूचे प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतर ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करावा.
नेत्रदान केल्यानंतर त्या डोळ्याचे पुढीलप्रमाणे उपयोग होतात
बुबूळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी, बुबूळावरील जखमांना पॅचिंग करण्याकरता, वैद्यकीय शिक्षणासाठी व संशोधनासाठी
नेत्रदान कोणास करता येत नाही ?
ज्या व्यक्तींना कावीळ, रक्तातील जंतुसंसर्ग झाला असेल, एड्स, सर्पदंश, मेंदूज्वर, ब्लड कॅन्सर इत्यादी कारणांनी मृत्यू झाला असेल अशा व्यक्तींना नेत्रदान करून घेऊन आपण प्रत्यारोपण करू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे हे सगळे जंतू दिलेल्या व्यक्तींमध्ये पसरू शकतात व त्यांना तो आजार होऊ शकतो तरीही नातेवाईकांनी अशा रुग्णांच्या मरणोत्तरच नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांचे डोळे हे संशोधनासाठी वापर करू शकतो.

Subscribe to my channel




