मालवणात आज रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा

बालगोपाळांसह महिला-पुरुषांनाही सहभागाची संधी; आकर्षक चषक, रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रांची मेजवानी

मालवण : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मालवण येथील भरड नाका येथे ‘भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘जयजयकार श्रीकृष्णाचा, वधी नरकासुराचा…’ या संकल्पनेतून होणाऱ्या या स्पर्धेत भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडणार आहे.

भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच पारंपरिक वेशभूषा आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. मालवण शहरासह तालुक्यातील बालगोपाळ, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. यात बालगट (बालवाडी ते पाचवी) प्रथम क्रमांक – ३,००० रुपये, द्वितीय क्रमांक – २,००० रुपये, तृतीय क्रमांक – १,५०० रुपये, पाच उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ५०० रुपये. खुला गट (महिला व पुरुष) प्रथम क्रमांक – ५,००० रुपये, द्वितीय क्रमांक – ३,००० रुपये, तृतीय क्रमांक – २,००० रुपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी १,००० रुपये. दोन्ही गटांतील विजेत्यांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

श्रीकृष्णाच्या विविध लीला सादर करण्याची संधी!

स्पर्धकांनी भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून एक ते दोन मिनिटांत त्यांच्या जीवनातील एखादा प्रसंग सादर करायचा आहे. यामध्ये राधाकृष्ण, कृष्ण-सुदामा, गोवर्धन पर्वत, कालियामर्दन, श्रीकृष्ण जन्म आणि कंसवध अशा विविध प्रसंगांचा समावेश करता येणार आहे. सादरीकरणासाठी एक किंवा दोन पात्रांचा सहभाग असू शकतो. वेशभूषा, सादरीकरणासाठी लागणारे साहित्य आणि तयारी स्पर्धकांनी स्वतः करायची आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार आहे.

समितीच्या नियोजन बैठकीत आयोजनाची रूपरेषा निश्चितया कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत भाऊ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यावेळी राजू बिडये, बंटी केनवडेकर, अनिकेत फाटक, हरेश पडते, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजक म्हणून अमित खोत, तर सहसंयोजक म्हणून भाऊ सामंत काम पाहत आहेत. नावनोंदणीसाठी बंटी केनवडेकर – ९४२२५९६६८२, अमित खोत – ९४०४४५७७८८ यांच्याशी संपर्क करावा. भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला, पराक्रम आणि भक्तिमय प्रसंगांचे दर्शन घडविणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्यात मालवणवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!